पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचं राजू शेट्टींना आश्वासन

| Updated on: Sep 06, 2021 | 9:33 PM

राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. त्यांची अमंलबजावणी तसेच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्यात यावी यासाठी विविध पातळ्यांवरून पाठपुरावा सुरु आहे.

पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचं राजू शेट्टींना आश्वासन
राजू शेट्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Follow us on

मुंबई :  पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. त्यांची अमंलबजावणी तसेच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्यात यावी यासाठी विविध पातळ्यांवरून पाठपुरावा सुरु आहे. याशिवाय पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये. त्याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतही तज्ज्ञांशी आणि यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (CM Uddhav Thackeray promises to help flood-hit farmers as per 2019 ruling)

सह्याद्री राज्य अतिथीगृहावर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

2019च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत दिली जाणार

बैठकीत पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात निर्माण झालेली पूरस्थिती, पूरबाधींतांना नुकसान भरपाई व त्यांचे पुनर्वसन याबाबत शेट्टी तसेच खासदार माने यांनी मांडणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, सन 2019 या वर्षी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने जी मदत केली आहे. त्याच धर्तीवर आताही मदत करण्यात येईल. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पडलेला अचानक पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस, त्याचबरोबर मराठवाडा, खान्देश व विदर्भ या परिसरातही मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळोवेळी येणा-या आपत्तीत लोकांचे होणारे नुकसान पाहून आपतग्रस्तांना देण्यात येणारी तात्काळ मदत शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिकची मदत दिली आहे.

पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत रिझर्व्ह बँकेशी चर्चा

मुख्यमंत्री म्हणाले, जुलै महिन्यातील अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांसाठी काढलेली पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत रिझर्व्ह बँकेशी याबाबत चर्चा करण्यात येईल. रोजगार हमीच्या माध्यमातून या भागात कामांना प्राधान्य देखील देण्यात येईल.

पूरपट्ट्यातील लोकांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न

पूरकालावधीत वाढणारे बॅक वॉटर यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक, तसेच आंध्रप्रदेश बरोबर देखील याबाबतीत संवाद समन्वय साधला आहे. धरणातील बॅक वॉटर बाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. पूरबाधीत क्षेत्रातील लोकांचे योग्य रित्या पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न आहेत. या पुनर्वसन धोरणांबाबत सहकार्य करावे असे आवाहनठाकरे यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत माजी खासदार शेट्टी, खासदार माने यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांनी पूरबाधीत शेतकरी व जनतेच्या समस्यांची माहिती दिली.

इतर बातम्या :

दरेकर म्हणाले, राजू शेट्टी बिनबुडाचा लोटा; शेट्टी म्हणतात, कुणाची भाटगिरी करताय?

उद्धव ठाकरे इलेव्हन दिवाळीपर्यंत तुरुंगात, आव्हाड तुम्हीही बॅग भरा; किरीट सोमय्यांचा थेट इशारा

CM Uddhav Thackeray promises to help flood-hit farmers as per 2019 ruling