मुंबई: मराठी भाषेबाबत बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला. भाषेवरून आमच्यावर टीका झाली. आताही होतेय. त्या टीकेला मी किंमत देत नाही. टीका करणारे काय किंमतीचे आहेत मला माहीत आहे. त्यामुळे मी किंमत देत नाही. शिवसेनाप्रमुखांवर (balasaheb thackeray) टीका झाली होती. हे मराठी (marathi) भाषेबद्दल बोलतात आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात, अशी टीका करण्यात आली होती. आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकली. पण शिवसेना प्रमुखांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं इंग्रजी शाळेत आणि मराठी घरात असली पाहिजे. मॉम, डॅड इकडे चालणार नाही. आजोबाला आजोबाच बोललो पाहिजे. फार तर आज्या म्हणा. माझी दोन्ही मुलं इंग्रजी बोलतात. हिंदी बोलतात आणि मराठीही बोलतात. भाषा शिकणं हा गुन्हा नाहीये. दुसऱ्या भाषेचा द्वेष करायचा नसला तरी मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मातृभाषेच्या मंदिराचं भूमिपूजन करत आहोत. त्याची सुरुवात करत आहोत. त्याबद्दल आनंद आहे. अनेकदा अशा गोष्टी होतात आयुष्य पुढे जात असतं. अनेक जबाबदाऱ्या येत असतात. त्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. काही काही जबाबदाऱ्या अशा असतात की आयुष्याचं सार्थक झालं असं वाटत असतं. त्यातील ही माझ्या आयुष्यातील मोठी घटना आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईसाठी आजोबा लढले, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले. आज मुख्यमंत्री म्हणून माझे नाव या इमारतीच्या भूमिपूजनाच्या पाटीवर लागले यापेक्षा माझ्या जीवनाचे दुसरे सार्थक असूच शकत नाही, असंही ते म्हणाले.
मराठी भवन बघण्यासाठी जगभरातील पर्यटक आले पाहिजेत असं करणार आहोत. जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात. पण आपल्या मातृभाषेचं भवन कसं असलं पाहिजे हे जा आणि मुंबईत जाऊन बघून या असं इतर देशांनी म्हटलं पाहिजे. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक इथं आलाच पाहिजे. मराठीचं वैभव आणि श्रीमंत त्याला समजली पाहिजे. या भाषेतील खजिना काही औरच आहे असं त्याला वाटलं पाहिजे. इतर भाषेचा मला द्वेष नाही. मराठी शिकवली गेली पाहिजे, मराठीत फलक लावला पाहिजे हा कायदा करावा लागतो. ही वेळ कुणी आणली. मराठीबाबत बरंच बोलता येईल. ही आपली मातृभाषा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या इथं मराठीत असल्याच पाहिजेत. पण आपण जेंव्हा असा आग्रह धरतो आणि यामुळे ज्यांच्या पोटात दुखते त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल. अटकेपार मराठी भाषेचा झेंडा नेणाऱ्या मराठी राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर त्याला धडा शिकवण्याची ताकत मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
विद्यावाचस्पती नको, डॉक्टरच शब्द ठीक आहे, मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमात Ajit Pawar यांची टोलेबाजी
Gudi padwa: ढोलताश्यांचा दणदणाट ते शोभायात्रा, राजकीय नेत्यांचा गुढी पाडवा सोहळा जल्लोषात!
Gudi Padawa : शेतकरीही साधतो पाडव्याचा मुहूर्त, काय आहे सालगड्याची परंपरा? वाचा सविस्तर