मुंबई । 24 जुलै 2023 : विधिमंडळ सभागृहात कामकाज सुरु असताना विविध संसदीय आयुधांचा वापर करून आमदार आपल्या प्रश्नांना न्याय मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. ग्रामीण भागातील आमदार आपल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडत असताना अन्य आमदार आपापसात चर्चा करत असतात. तर काही आमदार सभागृहात मोबाईलवर बोलत असतात. पिठासीन अधिकारी या आमदारांना वारंवार सूचना देत असतात तरीही हे आमदार ऐकत नाहीत. त्यामुळे सभागृहात चर्चा करणाऱ्या तसेच मोबाईलवर बोलणाऱ्या आमदारांना पीठासीन अधिकाऱ्यांनी चांगलीच तंबी दिली.
विधान परिषदेचे कामकाज सुरु असताना लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आल्या होत्या. पीठासीन अधिकारी उपसभापती नीलम गोऱ्हे या आमदारांना प्रश्न उपस्थित करण्यास सांगत होत्या. तर, आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री महोदय उत्तर देत होते.
सभागृहात प्रश्न आणि त्यावर मंत्री यांचे उत्तर असे कामकाज सुरु असताना काही आमदार अन्य गप्पा मारत होते. तर, एक आमदार मोबाईलवर चर्चा करत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आमदारांना निर्देश दिले.
प्रत्येक आमदारांना आपले प्रश्न महत्वाचे वाटत असतात. आपले प्रश्न जनतेसाठीच असतात त्यामुळे कोणत्याही आमदारांने प्रश्न मांडले तरी त्याकडे अन्य आमदारांनीही गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्या प्रश्नांत सहभाग घेतला पाहिजे. मात्र, त्याऐवजी आमदारांचे लक्ष दुसरीकडे असते. कोणताही प्रश्न एखाद्या मतदारसंघापुरता मर्यादित असला तरी त्याकडे आमदारांचे लक्ष असावे, असे उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
सभागृहात मोबाईलवर बोलण्याची परवानगी नसताना देखील बरेचसे सदस्य तोंडासमोर कागद धरून किंवा बाकाखाली वाकून मोबाईलवर बोलताना दिसतात. सभागृहातील सदस्यांना वारंवार सांगूनसुद्धा मोबाईलवर बोलताना दिसतात. त्यामुळे इथून पुढे जे कोणी मोबाईलवर बोलतील त्यांचे फोन जप्त करणार असे थेट निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. तसेच, ज्या सदस्यांनी बोलायचे असेल त्यांनी बाहेर लॉबीमध्ये जाऊन मोबाईलवर बोलावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.