सांगली लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये वाद वाढला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचवेळी काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. काँग्रेसच ही जागा लढवणार असल्याचे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. त्यासाठी विश्वजित कदम, विशाल पाटील हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेत सांगलीच्या जागेबाबत चर्चा केली.
सांगलीच्या जागेवर अनेक वर्षांपासून काँग्रेसचे अस्तित्व आहे. त्यामुळे ही जागा सोडायला नको, अशी भूमिका विशाल पाटील यांनी वरिष्ठांकडे मांडली आहे. त्यानंतर आता विशाल पाटील यांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी भूमिका मांडली आहे.
पोस्टमध्ये विशाल पाटील यांनी म्हटले आहे की, मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.
स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने विश्वजित कदम सर्व प्रयत्न करत आहेत.
या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपण सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.