उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होताच बैठकांचा धडाका, आतली बातमी काय?

| Updated on: Aug 06, 2024 | 7:28 PM

उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होताच बैठकांचा धडाका सुरु झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होताच त्यांची भेट घेतली आहे. या भेटीत महत्त्वाची चर्चा झाली. यानंतर उद्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबतही उद्या महत्त्वाची चर्चा होणार आहे.

उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल होताच बैठकांचा धडाका, आतली बातमी काय?
उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज पहिला दिवस आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. यानंतर ते दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर थोड्या वेळाने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सजंय राऊत, रमेश चेन्नीथला आणि जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे उद्या राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी दिल्लीत आहेत. त्यामुळे दिल्लीत महत्त्वाची चर्चा होईल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली.

“आम्हाला राज्यात सरकार आणायचं आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे इन्चार्ज आहेत. हे सर्व नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे आम्ही एकत्रल बसणार आहोत तर महाराष्ट्राबद्दलच चर्चा करणार नाही. आगामी काळात विधानसभा निवडणूक आहे. आम्हाला लोकसभेत महाराष्ट्रात चांगलं यश आहे. त्यामुळे विधानसभेत आम्हाला बहुमत आणायचं आहे याचसाठी आमची चर्चा असणार आहे”, अशी आतली बातमी संजय राऊत यांनी दिली.

‘मुख्यमंत्रीपदाचा अजून निर्णय झालेला नाही’

यावेळी रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे दिल्लीत आले आहेत. तर त्यांना भेटणे आमचं कर्तव्य आहे. मी त्यांच्या भेटीपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रात निवडणुका आहेत. राज्यात महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आजची चर्चा अनऑफिशियल झाली. ऑफिशियल बैठक मुंबईत होईल. महाराष्ट्रातील सरकार भ्रष्ट आहे. आम्ही अजून जागावाटप सुरू केलेलं नाही. मुख्यमंत्रीपदाचा अजून निर्णय झालेला नाही”, असं रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “मी राजकीय भेटीसाठी आलेलो नाही. सुप्रीम कोर्टाच्या केससाठी मी दिल्लीत आलो होतो. चेन्नीथल्ला आणि मी सोबत आलो हा योगायोग असू शकतो. उद्धव ठाकरे अनेक नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं समजत आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली. “जी अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही, असं दिसतं. न्यायव्यवस्था तराजू घेऊन उभी आहे. पण तिच्यातून न्याय मिळत नसेल तर हे खेदजनक आहे. अजित पवार यांना यातून पळ काढायचा आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.