मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती घटना कधी घडून येईल, याची काहीच शाश्वती नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात तीन राजकीय भूकंप घडून आले आहेत. पहिला भूकंप म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा पहाटेचा शपथविधी. त्यानंतर वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षात झालेली मोठी फूट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं सरकार हा दुसरा राजकीय भूकंप होता. तर तिसरा राजकीय भूकंप हा गेल्या महिन्यात घडून आला. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार सत्तेत आले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बनले.
या घडामोडींनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसबद्दल खूप मोठा दावा केला आहे. गिरीश महाजन यांनी काँग्रेस पक्षात मोठी फूट घडून येणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याबाबत सातत्याने चर्चा होत असते. पण गिरीश महाजन यांनी उघडपणे याबाबतचं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या हे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या चांगल्याच जिव्हारी लागलं आहे. त्यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आले, पण काँग्रेसला सध्या थांबवलं आहे, असं मोठं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय. राज्यातील सरकारमध्ये सगळे पक्ष असल्याचं मोठं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. सर्व पक्ष तर मला इथेच दिसत आहेत, जे असतील नसतील ते, कुणी सुटलेलं नाही. शिवसेना आहे, आम्हीपण आहोत, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, आता काँग्रेसपण येईल, पण काँग्रेसला सध्या थांबलेलं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंगेरीलाल के हसीन सपने, तशी गोष्ट आहे. गिरीश महाजन काय, गिरीश महाजनांच्या 20 पिढ्या आल्या तरी राज्यात काँग्रेसला फोडू शकणार नाहीत एवढं दाव्यावने मी सांगतो”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीदेखील गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “गिरीश महाजन अतिशय ज्ञानी माणूस आहे. त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.