बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना आणि परभणीतील पोलीस कोठडीत एका आंदोलकाचा झालेला मृत्यू, या दोन घटनांवरुन विरोधकांकडून महायुती सरकारवर निशाणा साधला जातोय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर सडकून टीका केली आहे. “शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाची विटंबना झाली. यानंतर आंबेडकरी जनतेने आंदोलनं केले. त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सरकारकडून कारवाई करण्यात आली. अनेक कार्यकर्त्याना मारहाण झाली, धरपकड करण्यात आली. त्यातील एका कार्यकर्त्याचा कोठडीत मृत्यू झाला, हे संतापजनक आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. परंतु असे होईल का याबाबत शंका आहे. कारण बीडमध्ये सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृणरित्या हत्या करण्यात झाली. सरपंचाच्या कुटुंबाला न्याय देणे सोडून ह्यातील आरोपीला राजकीय वरदहस्त वापरून आश्रय देणाऱ्यांना महायुती सरकार मंत्री करत आहे”, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.
“त्यामुळे परभणी प्रकरणात न्याय मिळेल का? हा प्रश्न आहे. संवेदना शून्य महायुती सरकार आज आपल्या विजयाच्या धुंदीत मग्न आहे. आंदोलकांचा जीव जातोय, लोकप्रतिनिधींवर हल्ले होताय तरी स्वतःच्या मिरवणुकीत सरकार व्यस्त आहे. आपण कसेही वागलो तरी आपण निवडून येऊ हा अहंकार आज या सरकारमध्ये आहे. सरकारने बहुमताचा अहंकार बाजूला ठेवून भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करावी ही आमची मागणी आहे”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
आमदार रोहित पवार यांनीदेखील बीडच्या घटनेवरुन महायुतीवर टीका केली आहे. “आदरणीय फडणवीस साहेब, बीड जिल्ह्यातील युवा सरपंचाची दिवसा ढवळ्या हत्या होऊनही हत्येचा मास्टरमाईंड अद्यापही मोकाट आहे. केवळ राजकीय लागेबांधे किंवा राजकीय वरदहस्त आहे म्हणून गुन्हेगारांना मोकाट सोडणे योग्य होणार नाही. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३६ खून, १६८ खुनाचे प्रयत्न, १५६ महिलांवर बलात्कार, ३८६ विनयभगंग झाले आहेत, गुन्हेगारांच्या दहशतीने असे अनेक गुन्हे तर पुढंही आलेले नाहीत. बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारीला मिळणारा राजाश्रय अतिशय धोकादायक असून याकडे सर्व बंधने तोडून केवळ माणूस म्हणून बघणे गरजेचे आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
“सरकारने आता गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यास महाराष्ट्रात ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. आपण गृहमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर राजकीय तडजोडी बाजूला सारून दोषींवर कारवाई करत गुन्हेगारांना संदेश देण्याची गरज आहे आणि तो संदेश आपण द्याल, ही अपेक्षा”, असं रोहित पवार म्हणाले.