महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष किती आणि कोणकोणत्या जागांवर लढणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानते, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. ही लढाई सर्वांची आहे. लोकशाहीसाठी ही सर्वांची लढाई आहे. गावपातळीवर फिरल्यावर भाजपच्या विरोधात प्रचंड रोष आहे हे लक्षात येत आहे. नक्कीच यावेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या वाढलेली दिसेल”, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचा अफवा पसरवण्यात आल्या. कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी हे करण्यात आला, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. लोकांमध्ये रोष दिसून येतोय. “भाजपने लोकांचा विश्वासघात आणि फसवणूक केली आहेच. लोकांनी आता ठरवलं आहे. देशभरात इंडिया आघाडीच्या खासदारांना नागरीक जास्त मतदान करतील. भाजपचं फक्त 400 ची घोषणा आहे. गावपातळीवर लोक त्यांच्यावर चिडले आहेत. कामं बरेच करण्यासारखे आहेत. पण सत्ता त्यांच्याबाजूला होती. पाण्याचं नियोजन करु शकले नाही. विमानतळ सुरु करु शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघून लोक आता मतदान करणार नाहीत’, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.