काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. “भाजपच्या IT सेलने एक खोटा व्हिडीओ व्हायरल केला. या व्हिडीओबाबत आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहोत. विशाळगडावरील महिला आमच्या कानातलं सुद्धा काढून घेतलं, असं सांगत होत्या. खासदार शाहू महाराज छत्रपती ऐकू येण्यासाठी तसे करत होते आणि महाराज मला सांगत होते परत की कानातले सुद्धा काढून घेतले. मात्र याचा विपर्यास करून जो खोट्या पद्धतीने देशपातळीवर ट्विटरवर व्हिडीओ व्हायरल करण्यात आला त्यावर रितसर गुन्हा दाखल करू”, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. “उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळगडावर आले हे आम्हाला माहीतच नाही. आम्हाला प्रसारमाध्यमांतून समजलं. वास्तविक शासनाची भूमिका काय आहे? हे लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडून जाणून घेतलं पाहिजे होतं”, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला. “कोल्हापूरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये बाहेरून लोक आले होते. आता सुद्धा पुण्यातून रवी पडवळ बाहेर पडलेला. हे यंत्रणांना माहीत होतं, त्याचवेळी कारवाई करायला हवी होती”, अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली.
“सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या दंगलींचे प्रकार राजश्री शाहू महाराजांच्या भूमीतच का घडत आहेत? याची पोलिसांना का चौकशी करत नाहीत? गजापूर गावातील लोकांनी तीन दिवस अगोदरच अशी काही घटना होईल आणि आमच्या गावाला संरक्षण द्या अशी मागणी केली होती”, असा दावा सतेज पाटील यांनी केला.
“मला वाटते खासदार बालिश आहेत. त्यांना माहीत नव्हतं तुमच्याच माध्यमातून आम्ही त्यांचा व्हिडीओ बघितला. आम्ही विशाळगडवर मदत केली एवढी प्राथमिक माहिती सुद्धा त्यांच्याकडे नव्हती आणि मदत कुठे केली गजापूरमध्ये? ज्या लोकांच्यावर अत्याचार झाला. तिथे महाराजांनी, आम्ही इंडिया आघाडी म्हणून मदत केली. अज्ञान असले की अशी वक्तव्य येतात”, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.
“शाहू नागरीत नागरिक म्हणून आपण कुठेतरी आवाज उठवणे गरजेचे आहे. शेवटी आता मी आणि महाराज इंडिया आघाडीचे आम्ही सगळे जाऊन आल्यानंतर आमच्यावर पण ट्रोलिंग चालू आहे. आता शांततेचं आवाहन केल्यावरही ट्रोल होत असेल तर मला वाटते अवघड आहे. समाज कुठल्या दिशेला चाललाय आपल्याला कळत नाही. वास्तव आपल्यासमोर आहे. विशाळगडच्या अतिक्रमणाचा विषय वेगळा आणि गजापूरचा विषय वेगळा. काल अनेकांनी ते दोन्ही गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला”, अशी देखील भूमिका सतेज पाटील यांनी मांडली.