सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. “संघाच्या लोकांनी म्हटलेलं संविधान कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखं आहे. तिरंग्यात तीन रंग असल्याने ते अशुभ असल्याचे म्हणाले होते. आता अचानक त्यांना तिरंगा आणि संविधान बाबतीत प्रेम निर्माण झालेलं आहे. आम्हाला स्वर्ग नको, राष्ट्रीय आराध्य दैवतेचे नावं भाजपवाले फॅशन म्हणून घेतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाभिमान मिळवून दिलाय, त्या सर्वांना स्वर्ग नकोय. मी सर्वांना मनापासून जयभीम करते. आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करतो. आम्ही संसदेत देखील निषेध व्यक्त केलाय. हा निषेध केवळ भाजप विरोध राहिलेला नाही”, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला.
“बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांची ही लढाई आहे. घरोघरी, गल्लीगल्ली ही लढाई सुरु राहील. अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे ही आमची भूमिका आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि इंडिया आघाडी या घटनेचा निषेध करतेय. आम्हाला संविधानावर आणखी चर्चा हवी होती पण भाजपने होऊ दिली नाही. त्यांनी वैयक्तिक टीका आणि आरोप करण्यात वेळ घालवला”, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
“भाजपला संविधान मान्य नाही ते केवळ मनुस्मृती मानतात. संघाने कायम तिरंग्याचा, संविधानाचा अपमान केलाय. अचानक त्यांच्या मनात आता संविधान आणि तिरंगाबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे. संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे पार पाहिजे होतं. पण या देशाचे जनतेने ते होऊ दिलं नाही. जनतेने हे चालू दिलं नाही म्हणून त्यांच्या मनात अचानक प्रेम निर्माण झालं”, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.
“अमित शाह यांचा खरा चेहरा संसदेत समोर आला. संविधान बदलण्याचं कट कारस्थान यांचे नेहमी सुरु आहे. अमित शाह जे बोलले ते केवळ एक संदर्भ नाही. अशा अनेक गोष्टी ते करत आहेत. पण जोपर्यंत इंडिया आघाडी आहे तोपर्यंत हे होऊ देणार नाही. प्रत्येकवेळी असं घडलं की हे विषयांतर करू पाहतात”, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
“सोलापुरात उद्या आम्ही एक मोर्चा काढणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत हा मोर्चा जाईल. अमित शाह जे बोलले ते रेकॉर्डवर आहे, आम्ही अरकाईव्हमधून तो व्हिडीओ मागतोय ते देत नाहीत. भाजपला मॉर्फ करण्याची सवय आहे. त्यामुळेच ते उलट आमच्यावर असले आरोप करतात”, असं प्रणिती शिंदे म्हणाले.
“राहुल गांधी उद्या परभणीला येणार आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतरच अशा गोष्टी घडायला सुरुवात होतात. ईव्हीएमची लढाई देखील अशीच आहे. ती भाजप विरुद्ध काँग्रेस राहिली नाही. लोकांची लढाई झाली आहे. मुख्यमंत्री हे ईव्हीएमचे मुख्यमंत्री आहेत”, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली. तसेच “राहुल गांधी मारकडवाडीला येतील. पण तारीख अजून निश्चित नाही. नाना पाटोले यांनी जे राजीनामा देण्याचं बोलले ते नैतिक जबाबदारी स्वीकारून बोलले. लाडकी बहीण आता सावत्र झाली का? हा चुनावी जुमला होता, हेच आता समोर आलं. सोलापूरला मंत्रीपद मिळालं नाही, ही शोकांतिका आहे. भाजपचं इथलं नेतृत्व सक्षम काम करत नाही. नोटबंदी सारखे निर्णय हे असंविधानिक होते. भाजपच्या काळात अघोषित आणीबाणी आहे”, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.