ठाणे महापालिकेत सोयीच्या ठरावांना मंजुरी; शिवसेनेविरोधात भाजपसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीही मैदानात

| Updated on: May 28, 2021 | 11:51 AM

राज्यातील सत्तेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र सारं काही अलबेल नसल्याचं चित्रं आहे. (Congress, NCP, BJP Unite Against Ruling Shiv Sena In thane corporation)

ठाणे महापालिकेत सोयीच्या ठरावांना मंजुरी; शिवसेनेविरोधात भाजपसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीही मैदानात
thane municipal corporation
Follow us on

ठाणे: राज्यातील सत्तेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र सारं काही अलबेल नसल्याचं चित्रं आहे. ठाणे पालिकेत शिवसेनेविरोधात केवळ भाजपच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही दंड थोपटले आहेत. नगरसेवकांचे माईक म्यूट करून सोयीचे ठराव मंजूर केले जात असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे. या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी थेट पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाण्यात शिवसेना विरुद्ध दोन्ही काँग्रेस असा सामना रंगताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress, NCP, BJP Unite Against Ruling Shiv Sena In thane corporation)

एकीकडे सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हातातहात घालून काम करत आहेत. तर दुसरीकडे ठाण्यात मात्र शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा सामना रंगला आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणार्‍या नगरसेवकांचे आवाज म्यूट करून सोयीचे ठराव पारित केले जात आहेत, असा आरोप शिवसेनेवर होत आहे. महत्वाचे म्हणजे ठाण्यात सेना व राष्ट्रवादीचे मंत्री असताना देखील स्थानिक पातळीवर सेना व राष्ट्रवादीमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर हा वाद पालिके पुरताच मर्यादित आहे की दोन मंत्र्यांमध्ये सुरू आहे, अशी चर्चाही ठाण्यात रंगली आहे.

विरोधक आयुक्तांना भेटले

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणार्‍या नगरसेवकांचे आवाज म्यूट करुन सोयीचे ठराव पारित केले जात आहेत. ऑनलाईन महासभेच्या नावाखाली ठामपामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात एकत्र येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. तसेच हे गैरप्रकार थांबविण्याची मागणी त्यांनी शर्मा यांना केली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा आवाज म्युट केला जात असल्याची तक्रार अनेकवेळा नगरसेवकांकडून केली जात आहे. तसेच होणारी चर्चा आणि ठराव यांच्यात सातत्याने तफावत आढळत असते. त्यामुळे हे प्रकार रोखण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे..

तर शिवसेनेला महागात पडेल

ठाणे पालिकेमध्ये सध्या खासगी कंपनीप्रमाणे कारभार केला जात आहे. जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणार्‍या नगरसेवकांचा आवाज म्यूट करणे, सोयीप्रमाणे ठराव पारित करून घेणे असे प्रकार सुरू असून हे प्रकार या पुढे खपवून घेणार नाही, असा इशारा पालिकेतील विरोधी पक्षनेते शानु पठाण यांनी दिला आहे. तसेच ठाणेकरांचे कुठलेही काम होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी केला आहे. ठाणे महापालिकेत एक विशिष्ट पक्षाच्या आदेशाने काम सुरू आहे. हुकूमशाही पद्धतीने पालिका चालत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला आणि आम्ही जर भविष्यात काही निर्णय घेतला तर राज्य सरकार अडचणीत येऊ शकते, असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे.

बोलूच दिले जात नाही

गेल्या वर्षांपासून ऑनलाइन महासभा सुरू झाली आहे. महासभेत चुकीच्या कारभारावर बोलणाऱ्या नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. फक्त आवडीच्या नगरसेवकांना बोलायला देतात. आतापर्यंत आम्ही बोलत होतो, मात्र आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पण अनुभव आला आहे. चुकीचे ठराव मंजूर केले जातात. तसेच आयत्यावेळी चर्चा करून ठराव घुसवले जात असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

हिंमत होती तर मला विचारायचं होतं

महापालिकेच्या कारभारावर असा आरोप करणे ही हास्यास्पद गोष्ट आहे. महासभेत बोलण्यात भाजप नगरसेवकांमध्ये नेहमी स्पर्धा असते. मुळात त्यांचा अचानक नेटवर्क गायब होतो. त्यामुळे त्यांना म्यूट केल्यासारखं वाटतं. मी कोणालाही म्यूट करत नाही. एका वेळी एका नगरसेवकास बोलण्यात सांगत असतो. मी पीठासीन अधिकारी आहे. त्यामुळे ही तक्रार माझ्याकडे करायला हवी होती. सभागृहात कोणाला बोलू देणे अथवा न बोलू देण हा माझा अधिकार आहे. आयुक्त त्याला काय करतील, असा सवाल महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे.

त्यांच्यात हिंमत होती तर त्यांनी मला विचारायला हव होतं. विरोधकांकडे विषय नाही म्हणून हे लोक स्टंट करत आहेत. महानगरपालिकेच्या नसलेल्या विषयावर ते महापालिकेच्या बाहेर बसून आंदोलन करतात. ठाणयात आमची एकहाती सत्ता असताना देखील आम्ही त्यांना आपले मानतो ही गोष्ट त्यांच्या पचनी पडत नाही. महापौराविरोधांत बोलणे ही त्यांची जुनी सवय आहे, असा टोलाही महापौर नरेश म्हस्के यांनी लगावला.

तर्कवितर्कांना उधाण

महापलिकेत चुकीच्या कारभाराविरोधात आतापर्यंत भाजपने आवाज उठवला होता. मात्र आता हा अनुभव राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना आला असून आमच्यावर अन्याय होत असल्याची टीका यावेळी नगरसेवकांनी केली आहे. आता हा वाद पालिका पुरताच मर्यादित आहे की यामध्ये काही राजकीय गणित दडली आहेत? महत्वाचे म्हणजे ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री असताना देखील दोन्ही पक्षात वाद निर्माण झाल्याने त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Congress, NCP, BJP Unite Against Ruling Shiv Sena In thane corporation)

 

संबंधित बातम्या:

केडीएमसीत आता शिवसेनेविरोधात भाजपची पोस्टरबाजी, रविंद्र चव्हाण यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

200 वर्षांपूर्वीचं धरण, रेल नीरला पाणीपुरवठा, पण रेल्वेचं जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा

सख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकून हत्या

(Congress, NCP, BJP Unite Against Ruling Shiv Sena In thane corporation)