गणेश सोनाने, Tv9 मराठी, अकोला | 21 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची स्थापना झालीय. या पक्षांमध्ये काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष आहे. पण याच पक्षामधील मोठी धुसफूस अकोला जिल्ह्यातूल समोर आली आहे. कारण एका माजी राज्यमंत्र्याच्या नेत्याने जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे हा नेता नगराध्यक्षदेखील आहे. त्यामुळे अकोल्यात काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरुय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांचे सुपुत्र संजय बोडखे यांनी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. संजय बोडखे हे अकोला जिल्हातल्या अकोट काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून अकोट नगरपालिकेची यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. त्यांनी अचानक अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी 20 नोव्हेंबरला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्याकडे राजीनामा पत्र दिलं आहे.
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोटचे संजय बोडखे यांच्यासह तब्बल 29 जणांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आल्या. तर विस्तारित कार्यकारिणीमध्ये काही नव्या चेहऱ्यांना तर काही जुन्या लोकांना समाविष्ट करण्यात आलं आहे. ज्यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांना सुद्धा नव्या विस्तारित कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच यामध्ये प्रोटोकाल पाळल्या गेला नसल्याचा आरोप काँग्रेस गटातील काहींनी केला आहे. त्यामुळे यातूनच संजय बोडखे यांनी नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा काँग्रेसच्या जेम्बो विस्तारित कार्यकारिणीमध्ये 2 वरिष्ठ उपाध्यक्ष, 1 कोषाध्यक्ष तर तब्बल 29 उपाध्यक्ष, 37 सरचिटणीस, 1 सरचिटणीस प्रशासन व संघटन, 2 सरचिटणीस प्रशासन, 82 चिटणीस, 81 सहचिटणीस, 1 प्रसिध्दी प्रमुख आणि कायम निमंत्रित असा समावेश आहे.