पनवेल: पनवेलमध्ये काँग्रेसच्या वतीनं इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शनं काढण्यात आलीत. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजपा सरकारच्या इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीच्या विरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार ही निदर्शनं काढण्यात आली असून, कळंबोली ब्लॉक शहर काँग्रेसच्यावतीने के एल २ मध्ये काँग्रेस महिला पदाधिकारी यांनी चुलीवर जेवण बनवून गॅसचा रिकामा बाटला उलटा ठेवून निषेध नोंदवलाय. उपस्थित पदाधिकारी यांनी भाजपाच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. (congress Protests in Panvel against the Centre fuel price hike, meals made on stoves in the streets)
वाढत्या पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने दंड थोपटले. काँग्रेस इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले. राज्यातील 1 हजार ठिकाणी हे आंदोलन करण्याचा मानस करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, काँग्रेसच्या आंदोलनात केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल 92 रुपये लिटर झालेय. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही. स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये झालाय. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात 7 जूनपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले.
यूपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती. ती आज 32.90 रुपये म्हणजे 258 टक्के आहे. तर डिझेलवर 3.56 रुपये होती. ती आज 31.80 रुपये आहे, म्हणजे 820 टक्के वाढ आहे. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या 7 वर्षात तब्बल 20 ते 25 लाख कोटी रुपयांची लूटमार केली आहे. तसेच 2001 ते 2014 या 14 वर्षांच्या काळात पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. 2018 मध्ये तो 18 रुपये प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 18 रुपये सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर 2.50 तर डिझेलवर प्रति लिटर 4 रुपये कृषी सेस घेतला जातो. या दरोडेखोरीविरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यास सुरुवात करण्यात आली.
यूपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरपेक्षा जास्त प्रतिबॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण झाला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका यूपीए सरकारने घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 64 डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे, अशी टीकाही यावेळी काँग्रेस सरकारच्या वतीने करण्यात आली.
हे आंदोलन नसून सर्वसामान्य नागरिकांना भूलथापांच्या आहारी घालणाऱ्या भाजपच्या नेत्यांना खडे बोल असले तरीही येथील नागरिकांना खरं आणि खोटं काय हे दर्शविणारे हे आंदोलन आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेसने देशावर सत्ता केली आणि त्यावेळी जी आंदोलने करण्यात आली त्या आंदोलनाचा भाग तेव्हाची देश वाचविण्यासाठी असणारी भाववाढ आणि आज देश लुटणारी भाववाढ याचा जनतेने विचार केला पाहिजे. पैसा झाडाला उगवत नाही, अशी म्हण आहे. मग जनतेच्या हितासाठी आम्ही काँग्रेसवासी तेव्हाही लढलो आणि आताही लढतच आहोत, हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे, असंही पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे सुदाम पाटील म्हणालेत.
यावेळी पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा शशिकला सिंह, जिल्हा उपाध्यक्ष संतोष चिखलकर, जयश्री खटकल, रामचंद्र पाटील, जयेश लोखंडे, सुभाष गायकवाड, अरुण ठाकूर, रमेश राव, रोहित पाटील, भागवत पाटील, नरेश कुमारिका, कलावती माळी, शिल्पा घोरपडे, सुनीता माळी, आरती पोतदार, सुरेश खोसे, भावना सिंग, विलास मागाडे, चेतन घोडके, प्रतीक मोदी, संजय विटेकर, अनिल सुर्यवंशी, शौकत खान, बाळू खरजे, आशादेवी, सविता सावंत, सती भिडे, प्रमिला कुमारी देवी, सपना दास,अरुण पालकर, राणी मॅडम, अनिता दळवी, सिंधू सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संबंधित बातम्या
प्रियकराबरोबर लग्न लावून देण्याच्या नावाखाली प्रेयसीची साडेचार लाखांची फसवणूक
Navi Mumbai Corona | ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, APMC मार्केटमध्ये कोरोनाचा नियमांना हरताळ
congress Protests in Panvel against the Centre fuel price hike, meals made on stoves in the streets