शिर्डी : 3 ऑक्टोबर 2023 | नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यात गाजली होती. कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सुधीर तांबे यांची आपला मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. तर, सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवून शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना आव्हान दिले होते. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे तांबे पिता पुत्र यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठ विधान केलंय. काँग्रेसमधील सर्वच विभाग महत्वाचे आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयांचे आरोग्य खराब झाले आहे. काही भागात ओला तर काही भागात कोरडा दुष्काळ पडला आहे. पण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी फिरताहेत. सरकारला राज्यातील जनतेचे काही देणे घेणे नाही. या हस्तकांना सत्तेबाहेर काढा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते. हे तीन इंजिनचे नाही तर तिघाडीचे सरकार आहे. सरकारमध्ये सध्या लुटीशिवाय दुसरं काही चालू नाही. निर्मल बिल्डींगमध्ये बसलेल्या दलालांच्या माध्यमातून राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सुरू आहे. त्याचे कंट्रोल दिल्ली दरबारी आहे. त्या हिशोबासाठीच मुख्यमंत्री आणि सुपर उपमुख्यमंत्री दिल्लीला पोहचले अशी टीका त्यांनी केली.
सरकार आनंदाचा शिधा वाटत आहे. पण, याच शिधाच्या माध्यमातून सगळा कमिशनचा व्यवहार चाललेला आहे. सरकारमध्ये आनंदाच्या शिधाच्या नावाने लोकांना लालच देण्याचे काम सुरू आहे. याचेही टेंडर निर्मल भवनमध्येच होणार. राज्यात फक्त लूट सुरू आहे. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही. सरकार मध्यावधी निवडणुकांच्या पुढे जाईल, असे ते म्हणाले.
नानांचं दिल्लीत वजन किती? अशी टिका सुनील तटकरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, नानाचे दिल्लीत किती वजन आहे हे सगळ्यांना माहित आहे. तटकरे यांचे पवारांकडे वजन कमी झाले. त्यामुळेच त्यांनी आणि प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादी तोडली. ईडीच्या यादीत सुनील तटकरे यांचे नाव आहे. त्यांनी पहिले आपले पाहावे आणि नंतर माझ्यावर टिका करावी, असा टोला त्यांनी लगावला.
इंडिया आघाडीमध्ये जागावाटपावरून कुठलाही वाद होणार नाही. सर्व्हे नुसार जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकचे आमदार सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील माजी आमदार सुधीर तांबे यांचे निलंबन मागे घेण्याबाबत पक्षामध्ये अजून कुठलीही चर्चा झालेली नाही असे विधान त्यांनी यावेळी केले.