गणेश थोरात, ठाणे, दि.22 डिसेंबर | राज्यात गेल्या वर्षभरात अनेक बदल झाले. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला. एकनाथ शिंदे यांना शिवसेना मिळाली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झाली. शिवसेनेतील या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर नेहमी शाब्दीक हल्ले करत आहेत. एकमेकांवर टीकेची एकही संधी दोन्ही गटाकडून सोडली जात नाही. दोन्ही गटांमध्ये अनेकदा हामारीतुमरी झाली आहे. परंतु ठाणे शहरात झालेल्या एका विवाहाची चर्चा रंगली आहे. ठाकरे आणि शिंदे गटात हा विवाह झाला. या विवाह सोहळ्याल दोन्ही गटाचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आले. त्यांच्यात गप्पा रंगल्या. पगंतीमध्ये आग्रहाने जेवण वाढले गेले. यामुळे विवाह सोहळ्याला आलेल्या सर्वांना वेगळेच दृष्य पाहण्यास मिळाले.
राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांशी वैर वाढलेले आहे. दोन्ही गटात वैर होण्यास सुरुवात ठाण्यातून झाली. या ठाण्यात एका विवाहाची चर्चा जोरदार चालू आहे. हा विवाह म्हणजे शिंदे गट आणि उद्भव ठाकरे गटामधील आहे. यानिमित्ताने दोन्ही गटातील नेते कार्यकर्ते एकत्र येताना दिसून आले. आमदार रवींद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक आणि सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गावकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक अॅड.आरती खळे यांचा शुभ विवाह ठाण्यातील घोडबंदर परिसरात पार पडला. यावेळी दोन्ही गटाचे सूर जुळलेले यानिमित्ताने पाहायला मिळाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नाशिक संघटक हेमंत पवार तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, राजन विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि स्थानिक शिंदे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र एकाच ठिकाणी आल्याने पाहायला मिळाले. यामुळे एक विवाह असाही, अशी चर्चा रंगली.