राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे इच्छुकांची तयारी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांमध्ये मेळावे, यात्रा सुरु झाल्या आहे. तसेच युती अन् आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभेत चांगले यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे मनोबल वाढले आहे. दुसरीकडे महायुतीने पराभवापासून धडा घेऊन नव्याने रणनीती तयार केली आहे. महाविकास आघाडीसमोर त्यांच्या पक्षातील पदाधिकारी अडचणी निर्माण करणार की काय? अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातून यासंदर्भात बातमी आली आहे. मुस्लिम समाजाला विधानसभेची उमेदवारी द्या, अन्यथा जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 जागा पाडणार असल्याचा इशारा सोलापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी चार जागा काँग्रेस, चार जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि तीन जागा शिवसेना ठाकरे गट लढणार असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर शहर मध्यची जागा माकपच्या नरसय्या आडम किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला देणार नाही, असेही काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी काँग्रेसचे पदाधिकारी शौकत पठाण यांचा काँग्रेस शहराध्यक्षाला थेट ईशारा दिला आहे. सोलापूर शहर मध्यची जागा मुस्लिम समाजातील नेत्याला देण्याची मागणी केली आहे. ती जागा न मिळाल्यास जिल्ह्यातील सर्व जागा पाडू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने काँग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी अकरा जागा पाडू म्हणणाऱ्या शौकत पठाण यांना खडे बोल सुनावले आहे. हे काँग्रेस भवन आहे. अकराच्या अकरा जागा पाडू, असे बोलू नका. प्रदेशाध्यक्षांनी अकरा मतदार संघाची माहिती मागितली आहे. त्यानंतर आपणास चार मतदार संघ सुटणार आहेत. त्यावेळी कोणाला उमेदवारी द्यावी, ही श्रेष्ठी ठरवणार आहेत. आपले काम आपण करत राहायचे आहे.