सोलापूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (26 फेब्रुवारी) मंगळवेढा येथे विकासकामांचे उद्घाटने केले. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी दिसून आली. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यानंतर आता सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला हरताळ फासल्याचे दिसून आले. याच मुद्द्यावरुन भाजप नेत्यांनी टीका करत कोरोना संपला आहे का? असा प्रश्न पालकमत्र्यांना विचारला आहे (Crowd in Minister Dattatray Bharne program in Mangalwedha).
भाजपची भूमिका काय?
या कार्यक्रमात कार्यकर्ते नियमांचं पालन करताना दिसले नाही. कार्यक्रमस्थळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. यावर भाजप नेते शशिकांत चव्हाण यांनी या गर्दीमुळे जर संसर्ग वाढला तर याला कोण जबाबदार आहे? हे सुध्दा सांगावे, असा टोला लगावला. मंगळवेढा येथे आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती. पण त्यापूर्वी त्यांनी मंगळवेढा शहरातील काही विकासकामांचे उद्घाटने करण्याचा सपाटा लावला होता.
दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया काय?
पालकमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखावा? यासाठी बैठक घेतली. पण त्यांच्या विकासकामे उद्घाटनाच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. शेकडो माणसे पालकमंत्र्यांच्या या कार्यक्रमात सहभागी असल्याचे दिसत होते. याबाबत दत्तात्रय भरणे यांना विचारल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमात फक्त पन्नास माणसांना परवानगी असून तेवढीच माणसे सहभागी असल्याचे स्पष्टीकरण दिले (Crowd in Minister Dattatray Bharne program in Mangalwedha).
मुख्यमंत्र्यांचं आवाहन नेमकं काय?
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना उद्घाटनांच्या कार्यक्रमांना गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. त्यानंतर अलीकडे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. त्यांनंतर राष्ट्रवादीचे राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज फटक्यांची आतषबाजी करत शेकडो कार्यकर्त्यांचा उपस्थित विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. पालकमंत्री सारखी माणसेच जर संसर्ग वाढत असतानाच अशा पद्धतीने गर्दीमध्ये कार्यक्रमात सहभागी होत असतील तर कोरोना संसर्ग रोखणार कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : खासगी कंपनीत काम करताय, मग ही कागदपत्रे त्वरित जमा करा; अन्यथा पगार लटकणार