नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी 700 गाड्यांची आवक झाली आहे. तर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार आल्यानं अनेकांचा उपवास असतो. संध्याकाळी उपवास सोडताना जेवणात कमीत कमी पाच भाज्यांचा समावेश केला जातो. त्यामुळे थोड्या-थोड्या प्रमाणात विविध भाज्या खरेदी केल्या जातात. बहुतांश पालेभाज्यांना प्राधान्य दिले जात असल्याने मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पालेभाज्या महागल्या आहेत.अळूच्या 10 ते 15 पानाची जुडी 50 रुपयांना विकली जात आहे. (Crowd in Navi Mumbai APMC market on first day of Shravan month)
मध्य रात्री सुरु होणाऱ्या मार्केटमध्ये पहाटे पासूनच किरकोळ विक्रेत्यांनी भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. यावेळी पालेभाजी खरेदीकडे ग्राहकांची झूबंड पाहायला मिळाली. तर उपवास केळीच्या पानांवर सोडण्याची प्रथा असल्याने आज केळीच्या पानांचंही भाजीपाला बाजारात आगमन झालं आहे. केळीची पानं खरेदी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अशावेळी केळीच्या एका पानाला 5 रुपये दर आकारला जात आहे. केळीच्या पानासह विविध पालेभाज्या खरेदी करताना ग्राहक दिसून आले.
भाज्यांचे आजचे भाव पाहिले तर मेथी 20 रुपये, पालक 10 रुपये, कोथिंबीरीच्या जुडीचा दर 10 रुपये दिसून आला. तर टोमॅटो 12 ते 13 रुपये, भेंडी 14 रुपये, दुधी 20, वांगी 16, वाटाणा 60, बीन्स 20, शिमला 12, कारले 10, गवार 40, कोबी 6, फ्लॉवर 15 रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव आहेत. एपीएमसीच्या किरकोळ बाजारात हेच दर दुपटीने आहेत. त्यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये काही भाज्या शंभरी पार गेल्या आहेत. तर पालेभाज्या सरासरी 50 रुपये जुडी अशा किमतीने मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एपीएमसी मार्केटमधील कांदा-बटाटा मार्केट व्यतिरिक्त इतर सर्वच मार्केटमध्ये खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. श्रावण महिन्यात अधिक लोक मांसाहार बंद करून शाकाहाराला पसंती देत असतात. त्यामुळे अन्नधान्यासह सर्वच मार्केटमध्ये गर्दी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर दरवर्षी संपूर्ण श्रावण महिना भाजीपाला आणि फळ खरेदीला ग्राहक पसंती देत असल्याचं व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 9 August 2021https://t.co/3H6KjO7NiV#mumbailocal | #BJP | #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
संबंधित बातम्या :
श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये “कही खुशी कही गम”
Crowd in Navi Mumbai APMC market on first day of Shravan month