सातारा : राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं असल्याने अनेक भागांमध्ये कडकडीत निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक कार्यक्रम, यात्रा, लग्न समारंभ यावर काही प्रमाणात बंदी घालण्यात आली आहे. असं असताना महाराष्ट्रात सर्वात मोठी समजली जाणारी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा आज हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांनी पार पाडली (crowd in Satara bagad yatra).
प्रशासनासोबत महिनाभर बैठाका होऊनही यात्रेला गर्दी
विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात बैठका सुरू होत्या. पण या सगळ्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चांना वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या आहेत. पहाटेच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येऊन बगाड यात्रेला सुरुवात केली. बावधन या गावात कंटेंमेंट झोन असून सुद्धा गावकऱ्यांनी प्रचंड गर्दीत यात्रा पार पाडली (crowd in Satara bagad yatra).
प्रशासनाकडून खबरदारी नाही
या यात्रेला जिल्ह्या बाहेरून सुद्धा नागरिक येत असताना प्रशासनाने कोणतीच खबरदारी घेतली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक जमले. गेल्यावर्षी सुद्धा अशाच प्रकारे ही यात्रा पार पडली होती. त्यावेळी देखील कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही यात्रा पार पडली होती. त्यानंतर प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. पण केवळ गुन्हे दाखल होतात. कारवाई होत नाही या गोष्टीचा गैरफायदा घेत या वर्षीही मोठ्या गर्दीत यात्रा पार पडली.
यात्रेत हजारो भाविक, कोराना प्रतिबंधात्मक नियम पायदडी
बगाड यात्रा पार पडल्यानंतर पोलिसांनी गावात यात्रेकरूंची धरपकड केली. अनेक यात्रेकरुंना अटक केली गेली. पण यात्रा निघण्याआधीच जर प्रशासनाने कडक निर्बंध केले असते तर आजची हजारोंच्या संख्येने गोळा झालेली गर्दी रोखण्यात प्रशासनाला यश मिळालं असतं. प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामूळे आता या यात्रेत हजारो भाविक गोळा झाले आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले.
ग्रामस्थांचा प्रशासनावर आरोप
नेत्यांच्या सभांना झालेली गर्दी चालते मग आमच्या धार्मिक कार्यक्रमांना का नाही? असा सवाल या यात्रेनंतर ग्रामस्थांनी उपस्थित केला. आम्ही फक्त मोजक्या लोकांच्या उपस्थिती ही यात्रा पार पाडत होतो. प्रशासनाच्या हलगर्जीपणामूळे ही गर्दी झाली, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
पोलिसांची भूमिका काय?
बावधन येथील बगाड यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढू नये, असे आदेश देण्यात आले होते. वारंवार बैठका घेऊन प्रशासनाने गर्दी होईल अशा कार्यक्रमांना निर्बंध घातले होते. पण आज हे सर्व निर्बंध झुगारून मोठ्या प्रमाणात बगाड यात्रा काढण्यात आली. त्यामुळे याबाबत कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
पालकमंत्र्यांची भूमिका काय?
प्रशासनाने वारंवार सूचना देऊन सुद्धा आज वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा मोठया प्रमाणात पार पडली आहे. दोन दिवसांपूर्वीच ही यात्रा प्राथमिक स्वरूपात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गावकऱ्यांनी सुद्धा यात्रा भरवणार नसल्याचे मान्य केले होते. मात्र गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने आता प्रशासन त्यांच्यावर निश्चित कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय.
आतापर्यंत 50 ग्रामस्थांना बेड्या
सातारा पोलिसांनी आता बावधन गावात नागरिकांची धरपकड सुरु केली आहे. गावातील 50 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. ही बगाड यात्रा करण्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर प्रशासनाने बंधने घातली होती तर रात्री उशिरा अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक गोळा कसे झाले? महिना भरापासून या अनुषंगाने बैठका घेतल्या जात होत्या तरीही प्रशासनाला या गोष्टी समजल्या का नाहीत? जर यात्रा करण्यावरच निर्बंध होते तर प्रशासनाने त्या दिशेने पाऊले का उचलली नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा : Pune Lockdown : पुण्यात मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली