बंगालच्या उपसागरात एकीकडे रेमल चक्रीवादळ घोंघावत असताना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाने अक्षरक्ष: थैमान घातलं आहे. अर्थात या दोन्ही वादळांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? हे सांगणं आता कठीण आहे. पण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक झालेल्या वातावरणातील बदलात काही अंशी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ कारणीभूत ठरलं आहे. दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात आज आलेल्या चक्रीवादळामुळे घरांची मोठी पडझड झाली आहे. अनेक घरांचे पत्रे उडाली आहेत. अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे टिनपत्रे उडाली आहेत. टिनपत्रे उडाल्यामुळे एकाचा हात कापला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत.
यवतमाळच्या आर्णी आणि महागांव तालुक्यात अचनाक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आर्णी, महागांव तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. आर्णी तालुक्यातील पाभळ तर महागांव तालुक्यातील तिवरंग, खली मलकापूर या गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पाभळ येथील 25 घरांची पडझड झाली आहे. अनेक घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. चक्रीवादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. चक्रीवादळात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडत आहे. त्यामुळे आर्णीच्या पाभळ गावाला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्याचं बघायला मिळत आहे.
जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जामनेर तालुक्यातील कापूसवाडी, देऊळगाव, फत्तेपूर अशा वेगवेगळ्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापूसवाडी येथे अवकाळी पावसामुळे तब्बल 3 बिगे केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. लागवडीसाठी कर्ज घेऊन तब्बल तीन लाखांचं खर्च आला. मात्र अवकाळी पावसामुळे लागवडीचा सुद्धा खर्च निघाला नाही. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळीची भाग जमीनदोस्त होऊन प्रत्येक शेतकऱ्याचं तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झालं आहे.
जळगावच्या जामनेर तालुक्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात अनेक ठिकाणी घरांचे तर काही गावांमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याचं विदारक चित्र पाहायला मिळाले. शेतकऱ्याने केळी लागवडीसाठी कर्ज घेऊन तब्बल तीन लाखांचं खर्च आला.. मात्र अवकाळी पावसामुळे लागवडीचा सुद्धा खर्च निघाला नाही. केळी तोडणीला आली होती, सकाळी व्यापारी सुद्धा येणार होता. मात्र रात्रीत अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे तब्बल पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्याचा केज शहराला मोठा फटका बसला आहे. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानावरील पत्रे उडाली तर झाडे देखील उन्मळून पडले. या वादळी वाऱ्यात मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने बराचा काळ वाहतूक ठप्प झाली होती.
धाराशिवच्या येवती गावात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील शेतकरी श्रीकृष्ण पडुळकर यांची दोन एकरावरील केळी बागेचे मोठे नुकसान झालं आहे. यामुळे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास या वादळी वाऱ्यामुळे धुळीला मिळाला आहे. दरम्यान केळीची बाग जोपासण्यासाठी टँकरने पाणी दिलं आहे. मात्र आता काढायला आलेल्या या केळीची बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी पडुळकर यांनी केली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पुस आणि गिरवली शिवरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे गिरवली शिवारात अनेक ठिकाणचे विद्युत खांब वाकले आणि मोडून पडले. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. शेतातील जनावरांच्या गोठ्यावरील आणि निवाऱ्यासाठी बांधलेले शेडवरील पत्रे आणि दोन्ही गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने गृह उपयोगी सहित्याचे नुकसान झाले. पुस येथील शिवाजी गौरशेटे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने घराचे नुकसान झाले.