या देशात पाठवला जाणार सायरस मिस्त्रीच्या मर्सिडिजचा डेटा, टेक्निकल फॉल्ट की ह्यूमन एरर हे तपासणार

| Updated on: Sep 07, 2022 | 9:43 AM

सायरस मिस्त्री यांचा रविवारी कार अपघातात मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघर नजीक हा अपघात झाला. त्यांची कार डिव्हायडरवर आदळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. ओव्हरस्पीड, राँग साइडने ओव्हरटेक अशा कारणांनी अपघात झाल्याचं प्राथमिक तपासाअंती कळतंय. सायरस मिस्त्री यांची कार डॉ. अनाहिता पंडोले या चालवत होत्या.

या देशात पाठवला जाणार सायरस मिस्त्रीच्या मर्सिडिजचा डेटा, टेक्निकल फॉल्ट की ह्यूमन एरर हे तपासणार
सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः टाटा ग्रुपचे (Tata Group) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघात (Accident) नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचा शोध विविध पातळ्यांवर घेतला जातोय. काही महत्त्वाच्या तपास संस्थांमार्फत चाचपण्या सुरु आहेत. अपघातावेळी सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमध्ये होते. मर्सिडीज बेंझ ही जर्मनीतली लक्झरी कार कंपनी आहे. त्यामुळे अपघाताची कारणं शोधण्यासाठी पालघर येथील अपघात स्थळावर कंपनीची एक टीम पोहोचली. घटनास्थळावरून गाडीचा पूर्ण डेटा कलेक्ट करण्यात आलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा डेटा आधी पुणे आणि नंतर जर्मनीला पाठवला जाईल.

जर्मनीत डेटा डीकोडिंग

पुढील तपासासाठी हा डेटा जर्मनीत डी कोड केला जाईल. त्यातून तांत्रिक माहिती उघड होईल. गाडीचे कोणते पॅरामीटर सुरु होते, कोणते बंद होते, हेही कळेल.

तांत्रिक बिघाड होता?

या कारमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, स्टेअरिंग लॉक, चाकांत बिघाड, आतील एअरबॅग का उघडली नाही, आदी सर्व शंकांचे निरसन या डेटाद्वारे केले जाईल. जर्मनीतील मर्सिडीजच्या प्लांटमध्ये डेटा डीकोड करण्याची सुविधा आहे.

हायवेचंही सर्वेक्षण

स्टेट ट्रॅफिक पोलीस मुंबई अहमदाबाद हायवेवर साइनेज, स्पीड लिमिट बोर्ड आणि स्पीड अलर्ट आहेत का, याचा तपास करेल. सूर्या नदीच्या पूलावर जिथे अपघात झाला, तिथे सायनेज नसल्यामुळे थ्रीलेन ऐवजी टू लेन बनवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. यासह ब्लॅक स्पॉटही शोधले जातील.

राज्य वाहतूक दलाचे अतिरिक्त संचालक केके सारंगल म्हणाले, अपघात झाला, तिथे उजवीकडे वळ आहे. त्यामुळे तिथे वेगासंबंधी दिशानिर्देश गरजेचे होते. वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणाचा अहवाल NHAIला पाठवला जाईल.

कुठे झाला अपघात?

सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात रविवारी मुंबई अहमदाबाद हायवेवर झाला. ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. वाटेत पालघर जवळ त्यांची कार डिव्हायडरवर आदळली. डॉ. अनाहिता पंडोले (55 वर्षे) या कार चालवत होत्या. त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या बाजूला समोरील सीटवर पती डेरियस पंडोले होते.

पतीचे भाऊ जहांगीर दिनशा पंडोले आणि सायरस मिस्त्री मागील सीटवर बसले होते. अनाहिता आणि त्यांचे पती बचावले. गंभीर जखमी झाले तर सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. या दोघांनी सीटबेल्ट लावला नव्हता, असे म्हटले जात आहे.