नाशिक : गेल्या काही वर्षांपासून नाशिक ( Nashik ) महसूल विभागाचे विभाजन करून स्वतंत्र खान्देश ( Khandesh ) विभाग करावा अशी मागणी केली जात आहे. यावरून दोन गट पडले आहे. त्यासाठी मालेगावमधील अनेक नागरिक या मागणीला विरोध करत आहे. याचे कारण म्हणजे मालेगाव जिल्हा होणार असल्याने त्यामध्ये देवळा आणि चांदवडचाही समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक लोकं हे दादा भुसे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करत असल्याने त्यावेळी दादा भुसे हे अनेकांना आश्वासित करत आहे. जर असा निर्णय घेतलाच तर आम्ही होऊ देणार नाही तुम्ही काळजी करू नका म्हणून धीर देत आहे.
तर दुसऱ्या बाजूला जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक नाशिक महसूल विभागाची विभागणी करावी अशी मागणी करत आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांमध्येच या मुद्द्यावरून दोन प्रवाह पडणार आहे.
खान्देशमधील अनेक नागरिकांना नाशिकला महसूल कार्यालय असल्याने अनेक अडचणी येतात. तेच कार्यालयात खान्देश विभागात यावे अशी मागणी केली जात आहे. त्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी नंदुरबार येथील एका कार्यक्रमात याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यावरून पुन्हा स्वतंत्र खान्देशची मागणी होऊ लागली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याचेही बोलले जात आहे.
जर खान्देशमधील मंत्र्यांनी या मागणीला बळ दिल्यास नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची मोठी अडचण होणार आहे. त्यामध्ये दादा भुसे यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यात दादा भुसे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या विषयी कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे म्हंटले आहे.
एकूणच यावरून दादा भुसे यांना विचारणा केली जात आहे. त्यामुळे दादा भुसे यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. असा कुठलाही निर्णय झालेला नसून त्याबाबत काहीही होणार नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यास त्याला दादा भुसे विरोध करणार असल्याचे चित्र आहे.
नाशिक महसूल विभाग असल्याने नंदुरबार, जळगाव आणि धुळे येथील नागरिकांसाठी ही मागणी महत्वाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतात का ? जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यास त्याला दादा भुसे विरोध करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.