उमेश पारीक, नाशिक, दि. 27 नोव्हेंबर 2023 | राज्यात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार दोन दिवसांपासून गारपीटसह पाऊस सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागा उद्धवस्थ झाल्या आहेत. द्राक्ष पंढरीत गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवादिल झाले आहेत. रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यांत तुफान गारपीट झाली होती. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे सोमवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुट्ट्या असल्या तरी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
द्राक्ष बागेला एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. मात्र शासनाकडून तुटपुंजी मदत मिळते. यामुळे नुकसानीचे पंचनामे करताना एकरी दीड ते दोन लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा, सिताफळ, वाल, शेवगा, तुर, मकई पिकाचे नुकसान झाले आहे.
नाशिकमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. नाशिक जिल्ह्यांत निफाड तालुक्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. द्राक्ष, डाळिंब, गहू, भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा आडव्या झाल्या. पावसानंतर द्राक्ष बागांवर आता डावणी रोगाचे संकट निर्माण झाले आहे.
मालेगाव, मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. परिसरात झालेल्या तुफान गारपीटमुळे शेतात गारांचा खच पडला आहे. त्यामुळे कांदा, गहू यासह रब्बीचे इतर पीक आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडे उन्माळून पडली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.