सागर सुरवसे, सोलापूर, | 2 डिसेंबर 2023 : आपल्या अदाकारी आणि नृत्याने अनेकांना वेड लावणारी गौतमी पाटील आता रुपये पडद्यावर येत आहे. तिची लावणी आणि सौंदर्यामुळे तिच्या कार्यक्रमांना राज्यभरात मोठी मागणी असते. तिचे नृत्य अनेकांना घायाळ करणारे आहे. राज्यातील महानगरात नव्हे तर खेड्यापाड्यात तिचे कार्यक्रम हाऊसफुल्ल झाले आहेत. या कार्यक्रमांना गर्दीमुळे पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो. आता गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर येत आहे. तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौतमी पाटील हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘घुंगुरु’ चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट येत्या 15 डिसेंबरला एकाच वेळेस 100 चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे निर्माते बाबा गायकवाड यांनी सांगितले.
बाबा गायकवाड यांनी ‘घुंगुरु’ चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. चित्रपटाचे निर्मातेही तेच आहेत. ‘घुंगुरु’ चित्रपट 15 डिसेंबरपासून प्रदर्शित होणार असल्याची माहिती बाबा गायकवाड यांनी पंढरपूरमध्ये दिली. हा चित्रपट गौतमी पाटील हिच्या आयुष्यावर दाखवण्यात आला आहे. तिला जीवनात आलेला संघर्ष आणि मिळालेले यश चित्रपटातून दाखवले असल्याचे दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी सांगितले. एकंदरीत लोककलावंत आणि त्यांचा संघर्ष चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटात सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
गौतमी पाटील ही स्वत: चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. 10 डिसेंबरपासून त्यासाठी ती राज्यातील प्रमुख शहरात फिरणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेरही झाले. देशातील सात राज्यांत चित्रीकरण झाले आहे. तसेच मराठीसह इतर हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांतही चित्रपटाचे डबिंग करण्यात येणार आहे. गौतमी पाटील हिचा कार्यक्रमांनी युवकांना वेड लावले. युवतीसुद्धा तिच्या कार्यक्रमांना येत होत्या. आता चित्रपटासंदर्भात उत्सुक्ता निर्माण झाली आहे. गौतमी हिच्या कार्यक्रमांप्रमाणे चित्रपटही चाहत्यांना सिनेमागृहात आणणार का? हे १५ डिसेंबरपासूनच समजणार आहे.