मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ 30 जूलै रोजी घेतली. त्यानंतर आता 12 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. सुप्रीम कोर्टात 11 जुलैला बंडखोर आमदारांबाबत सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे त्यावेळी सांगण्यात येत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हे दरम्यानच्या काळात दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेटही घेऊन आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या झालेल्या भेटीत मंत्रिमंडळ वाटपाबाबत चर्चाही झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरला रवाना झाले. आषाढीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल, असे दिल्लीच्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी सांगितले होते. गडचिरोली दौऱ्यानंतर रात्री उशिरा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तासांची याबाबत चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र आता राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ वाटप पुन्हा एकदा आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी सर्वच आमदार मुंबईत येतील. त्याचवेळी एक दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. 17 किंवा 19 तारखेला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. आमदारांना पुन्हा पुन्हा मुंबईत बोलवायचा खर्च टाळण्यासाठी भाजपचा हा प्लॅन असल्याचं सांगण्यात येते आहे.
भाजपा आणि शिंदे गटात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा असल्याचे मानण्यात येते आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाला 27 आणि शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आपल्यालाच मंत्रिपद मिळावे आणि तेही चांगले मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक आमदार एक दोन दिवसांत एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांची यासाठी भेटही घेत असल्याचे सांगण्यात येते आहे. आजही संजय शिरसाट आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यापूर्वी 13 तारखेला मंत्रिमंडळातील पहिल्या 13 मंत्र्यांचा शपथविधी होईल असे सांगण्यात येत होते. यात भाजपाचे 8 आणि शिंदे गटाचे पाच मंत्री शपथ घेतील असेही सांगण्यात येत होते. आता मात्र 18 तारखेच्या आसपास जो शपथविधी होईल, तो पूर्ण मंत्रिमंडळाचाच होईल, अशी चर्चा आहे.