खेड, रत्नागिरी, दि. 5 जानेवारी 2024 | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. दाऊद इब्राहिम याचे मुळगाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील मुंबके गावातीलजमिनीचा लिलाव शुक्रवारी होणार आहे. खेड तालुक्यातील चारही जमिनी दाऊद याची आई असिना बी हिच्या नावावर आहे. जवळपास चार वर्षांपूर्वी या जमिनी जप्त करण्यात आल्या होत्या. साफेमा अर्थात स्मगलर फॉरेन एक्सचेंज मेनिपुलेटर ॲक्ट अंतर्गत केंद्र सरकारने दाऊदच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली. 5 जानेवारी 2024 रोजी हा लिलाव होणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत हा लिलाव होणारा आहे.
दाऊद इब्राहिम यांच्या मालमत्तेचा लिलाव 3 पद्धतींमध्ये होईल. ज्यामध्ये ई-लिलाव, सार्वजनिक लिलाव आणि निविदा सीलबंद लिफाफ्यात बोली लावता येणार आहे. लिलावाच्या तिन्ही बोली या एकाच वेळी होणार आहे. अंदाजे 20 गुंठे इतकी ही जमीन आहे. आता लिलाव होणार्या चार मालमत्तांची एकूण राखीव किंमत 19 लाख रुपये आहे. पहिल्या जमिनीचे क्षेत्रफळ 10,420.5 चौरस मीटर असून त्याची राखीव किंमत रु. 9.41 लाख रुपये आहे. दुसरी जमीन 8,953 चौरस मीटर असून त्याची राखीव किंमत रु 8 लाख आहे. तिसरी जमीन जवळपास 171 चौरस मीटर आहे. त्यासाठी राखीव किंमत 15,440 रुपये आहे. तर चौथ्या जमिनीचे क्षेत्रफळ 1,730 चौरस मीटर असून त्यासाठी राखीव किंमत 1.56 लाख रुपये आहे.
एकंदरीत या जमिनीचे सातबारे पाहिल्यानंतर एक गोष्ट महत्वपूर्ण आहे. या सातबारावरती दाऊदच्या आईसह इतरही हिस्सेदारांची नावे आहेत. त्यामुळे लिलाव होत असताना दाऊदच्या आईच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा लिलाव होणार आहे. दरम्यान सध्याच्या घडीला या सातबारावरती नजर मारल्यानंतर दाऊदच्या आईच्या नावाऐवजी ‘साफेमा’चे नाव दिसून येते. यापूर्वी या जमिनीचा लिलाव किंवा जमीन विकत घेण्यासाठी कोणीही रस दाखवला नव्हता. दरम्यान आता दुसऱ्यांदा हा लिलाव होत आहे. त्यामुळे ही जमीन खरेदी करण्यासाठी नेमकं कोण पुढाकार घेतंय? ही जमीन लिलावमध्ये कोण खरेदी करतंय? हे आज स्पष्ट होईल. दाऊद किंवा त्याच्या नातेवाईकांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील दाऊदच्या मूळ गावातील बंगला, जमीन शिवाय खेड जवळील लोटे येथे असलेला बंद अवस्थेतील पेट्रोल पंप यांचा देखील लिलाव करण्यात आला आहे.