Nagpur Hit and Run Case : संकेत बावनकुळे याची मेडिकल टेस्ट का केली नाही? पाहा डीसीपींची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 11, 2024 | 7:41 PM

नागपुरातील हिट अँड रन प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भरधाव ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातामधील धडक देणारी कार ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात येत होते. अखेर नागपूरचे डीसीपी राहुल मदने यांनी या कारवाईवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

Nagpur Hit and Run Case : संकेत बावनकुळे याची मेडिकल टेस्ट का केली नाही? पाहा डीसीपींची प्रतिक्रिया
नागपूर हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर
Follow us on

नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचं नाव आल्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. या प्रकरणात संकेत बावनकुळे याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांवर दबाव होता का? संकेतची मेडिकल टेस्ट का केली नाही? गाडी मालक म्हणून संकेत बावनकुळेवर गुन्हा का दाखल होत नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता डीसीपी राहुल मदने यांनी दिली आहेत. नागपुरात 9 सप्टेंबरला भरधाव ऑडी कारने अनेक वाहनांना जोरदार धडक दिली होती. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला होता. या ऑडी कारमध्ये महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे होता. तसेच संबंधित कारचा मालकदेखील संकेतच होता. या घटनेत संकेतवर गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबतच्या अनेक प्रश्नांवर डीसीपींनी प्रतिक्रिया दिली.

1) पोलिसांवर राजकीय दबाव आहे का?

उत्तर : “आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही आणि आम्ही त्याला बळी पडण्याचं कुठलंही कारण नाही. जी काही कायदेशीर प्रोसिजर आहे, आम्ही त्या पद्धतीने समोर जात आहोत. ऑडी कार अर्जुन चालवत होता. त्याच्या शेजारी संकेत बसला होता. तर पाठीमागच्या सीटवर रोनित बसला होता. ऑडी कारचं आरटीओकडून इन्स्पेक्शन झाला आहे. मेडिकल अहवाल ही आम्हाला मिळालं आहे. जो काही तपास सुरू आहे तो नियमाप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे कोणालाही वाचवण्याचं कारण नाही.”

2) संकेतची मेडिकल टेस्ट का केली नाही?

उत्तर : “संकेत त्या गाडीत होता हे जवळपास 12 ते 15 तासांनंतर समोर आले. त्यामुळे तेव्हा त्याची मेडिकल टेस्ट करण्यामध्ये काहीही अर्थ नव्हता.”

3) गाडी मालक म्हणून संकेत बावनकुळेवर गुन्हा का दाखल होत नाही?

उत्तर : “जर गाडी मालकाने एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला गाडी चालवायला दिली आहे, लायसेन्स नसलेल्या व्यक्तीला गाडी चालवायला दिली आहे, असं आढळलं तर गाडी मालकावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात असं काहीही झालेलं नाही.”

4) गाडीवर नंबरप्लेट का नाही?

उत्तर : “आम्ही गाडी ताब्यात घेतली तेव्हा गाडीवर नंबरप्लेट लागलेली होती. पोलीस स्टेशनमध्ये गाडी आणली तेव्हाही नंबर प्लेट लागलेली होती. मात्र ती अपघातामुळे लूज झालेली होती. ती पडू नये, गहाळ होऊ नये म्हणून काढून गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली आहे. नंबर प्लेट आम्ही जप्त केली आहे.”

5) अपघात घडवणाऱ्या तरुणांनी बीफ खाल्लं होतं का?

उत्तर : “असं काहीही नाही, असं बिलामध्येही नमूद नाही.”