मनोज गाडेकर, शिर्डी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टी कमी केल्या? असा जाब विचारल्याची बातमी समोर आली होती. आता त्या भेटीवर दीपक केसरकर यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “आम्ही ज्यादिवशी बसलो त्यादिवशी माझ्या सासूबाई, पत्नीच्या आईंचं निधन झालेलं होतं. त्यामुळे मी उपाध्यक्षांना सांगायला जात होतो की, मला कामातून थोडी सवलत द्या, मला अंत्ययात्रेत जायचं आहे. पण त्यावेळी मला हे सगळं ऐकावं लागलं. ऐकल्याबद्दल दु:ख नाही”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिलं.
“कटुता कमी करणं हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी काल ज्यावेळेला त्यांना भेटलो तेव्हा ते भावनाविवश झालेले होते. ते काय बोलले, मी त्यांना मानणारा, त्यांच्याबद्दल आदर ठेवणारा मनुष्य आहे. त्यामुळे मी त्यांना काहीच उत्तर दिलेलं नव्हतं. मी फक्त एवढंच म्हटलं की, साहेब मला आपल्याबद्दल आदर आहे. तो आदर मी पक्ष सोडताना देखील दाखवला होता. मी त्यांना सांगितलं होतं की, ज्यावेळेस घर पेटतं त्यावेळेस आग अगोदर विझवायला लागते. कशामुळे लागली हे नंतर बघुया. आधी आपलं घर सुरक्षित ठेवूयात. ऐकलं नाही. ते मोठे आहेत. मी छोटासा मनुष्य आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“आपले जवळचे सहकारी, आपल्याला मानणारी लोकं आपल्याला सोडून गेली याबद्दल दु:ख शंभर टक्के असू शकतं. त्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या. त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं. आपण त्यांच्याजवळ होतो, त्यांनी भावना व्यक्त केल्या. पण दुसऱ्या दिवशी तोच मजकूर ज्यावेळेला टीव्हीवर दाखवला जातो त्यावेळेला ज्या भावना दुखवला जातात”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“भावना दुखावल्या जाऊ नये. कारण तो आदर असतो. प्रेमाचा अपमान होता कामा नये. मीडियामध्ये छापून येतं तेव्हा त्याचं स्पष्टीकरण मलासुद्धा द्यावं लागतं. त्यांच्या लोकांच्या माध्यमातून त्यावरुन ते आपली मतं बनवत असतात. त्यामुळे ज्यावेळेला मी या सर्वांवर मत देईल त्यावेळी ते मत उद्धव ठाकरेंना नसेल तर त्यांच्या लोकांनी जे मीडियात प्रसारित केलंय की त्याचं असं उत्तर देईन की, महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला प्रेमाची किंमत काय असते ते कळेल”, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला.
“पैशांनी प्रेम विकत घेता येत नाही. पैशांसाठी मनुष्य विकला जात नाही. त्याचं मन जिंकायला लागतं. ते मन एकनाथ शिंदे यांनी जिंकलंय. म्हणून आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. काय-काय झालं ती प्रत्येक गोष्ट सांगेन. नवीन वर्ष आहे म्हणून उत्तर दिलं नाही. ते काय घडलं याचं आत्मपरिक्षण मी केलं पाहिजे तसं त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केलं पाहिजे. आणि तसं झालं तर मग शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही”, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं.