जळगाव : पोलीस दल जे लोकांच्या रक्षणासाठी आणि न्याय देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतं, जेथे सर्व जाती धर्मांच्या लोकांना एका समान नजरेने पाहिलं जातं. प्रत्येक क्षेत्रात काही सडके आंबे असतात, असेच पोलीस दलात काही सडके आंबे असल्याचं समोर आलं आहे. हे सडके आंबे बडतर्फ करावेत म्हणजे पोलीस दलातून थेट काढून फेकणे गरजेचे आहे. यामुळे पोलीस दलात अशा बेशिस्त वर्तन करणाऱ्या बकालेसारख्या अधिकाऱ्यांवर जरब बसेल. किरणकुमार बकाले( Kiran Kumar Bakale) यांचं हे वक्तव्य चिथावणी देणारं, समाजासमाजात तेढं निर्माण करणार, शांतता भंग करणारं, जातीयवादाचं विष पेरणारं आहे. या वक्तव्यानंतर बकाले पोलीस दलासाठी लायक नाहीत, त्यामुळे त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी होत आहे.
जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने एका समाजाबद्दल अतिशय घाणेरडे वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य प्रत्येक समाजातील महिला आणि पुरुष यांच्या स्वाभिमानाला आणि चारित्र्याला धक्का देणारं आणि दुखावणारं आहे.
वास्तविक पाहता जळगाव जिल्ह्यात गाईंची चोरी हा विषय आघाडीवर आहे, या कामात किरणकुमार बकाले याने आतापर्यंत या रॅकेटमागे कोण आहे, हे समोर आणलेले नाही. हजारो गाई अजूनही सापडलेल्या नाहीत, अशा अनेक विषयात किरणकुमार यांच्या तपासाची बोंबाबोंब आहे.
याच किरणकुमार बकालेने एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे, या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीये, त्यानंतर सर्व समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, या साऱ्या प्रकाराची दखल पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी गंभीरतेने घेतलेली दिसत नाही.
पोलीस निरीक्षक बकाले यांची फक्त बदली करण्यात आली आहे, किरणकुमार बकालेवर अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. स्थानिक गुन्हे शाखेतून त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मुंडे यांनी किरणकुमार बकालेची फक्त बदली करुन प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवीण मुंडे यांच्याकडून हे अभय का असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक बकाले यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे, बकाले यांच्यावर कारवाई केली नाही, तर भव्य मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान दुसरीकडे बकाले यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण आक्रमक झालं आहे, जळगाव शहरातील काही नागरिकांनी बुधवारी दुपारी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन, बकाले यांच्यावर कडक कारवाईची मागणी करत निवेदन सादर केले. बकाले यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काही नागरिकानी काळ्याफिती लावल्या होत्या.