Santosh Deshmukh murde case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला. या मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. या मोर्चातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिला. या मोर्चातून सर्वांनी मनोगत व्यक्त केली. तसेच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने आपल्या भावना मोकळ्या करुन दिल्या. वडिलांना न्याय मिळवून द्या अन् असा प्रकार पुन्हा कोणत्याही कुटुंबाबाबत होऊ नये, असे भावनावश होत वैभवी यांनी सांगितले.
मोर्चात बोलताना वैभवी देशमुख म्हणाली, माझा वडिलांचा जन्म येथेच झाला होता. त्याच ठिकाणावरुन मी तुम्हा सर्वांना विनंती करते माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे. तुम्हा सर्वांना सांगते माझ्या वडिलांची हत्या कशाप्रकारे झाली? हे तुम्हाला माहीत आहे. त्यांचा काहीच गुन्हा नसताना त्यांची हत्या झाली. ते नेहमी समाजासाठी झुंजत होते. समाजाचे काम करत होते. हत्येच्या दिवशीसुद्धा ते दुसऱ्यासाठी लढत होते. त्या दिवशी माझी वडील दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करण्यासाठी गेले होते. त्या व्यक्तीला मदत करत असताना हा प्रकार घडला.
वैभवी यांनी सांगितले की, आज माझ्यावर ही वेळ आली. ती वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये. मला माहीत आहे आता माझे वडील आता मला कधीच दिसणार नाही. परंतु वडिलांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुम्ही सर्वांनी एकत्र या. माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. हा लढा आपण सर्वांनी एकत्र लढवून पुढे नेऊ. हा अन्याय पुन्हा होऊ देऊ नये. आज तुम्ही मोठ्या संख्येने माझ्यासोबत आहात, तसेच नेहमीच माझ्यासोबत राहा.
वैभवी देशमुख म्हणाली की, माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करुन त्यातील सर्व दोषी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. उर्वरित लोकांनाही लवकरात लवकर अटक झाली पाहिजे.