गोंदिया : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतांना गोंदियामध्ये आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते खासदार प्रफुल्ल पटेल ( Prafull Patel ) आणि भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) आज एकाच मंचावर पाहायला मिळाले आहे. त्याच दरम्यान दोन्हीही नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेली राजकीय फटकेबाजी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल ( Manoharbhai Patel ) यांच्या 117 व्या जयंतीनिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित असतांना प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार असल्याने काय बोलणार ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
याच दरम्यान आपल्या भाषणात बोलत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर स्तुतीसुमणं उधळली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी सुरू असतांना फडणवीस आणि पटेल एकाच मंचावर येणं हा चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ते नाना पटोले यांचे होमग्राऊंड आहे.
अशाच वेळी प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सारखा हुशार नेता नाही असे म्हणत कौतुक केले आहे. यावेळी प्रफुल पटेल यांनी आमच्यात अनेक विषयांवर गुप्त चर्चाही सुरू असतात असे म्हंटले आहे.
याशिवाय प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांनी आपण दोघे येणार म्हंटल्यावर चर्चा तर होणारच असेही म्हंटले आहे. त्यावेळी विचारांचे विरोधक असलो तरी व्यक्ती म्हणून विरोध नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकमेकांवर ज्या पद्धतीने कौतुकांचा वर्षाव केला आहे. ते पाहता राजकीय चर्चेला उधाण आले आहे. इतकंच काय आगामी काळात प्रफुल्ल पटेल भाजपात प्रवेश करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही इथवर अंदाज बांधले जात आहे.
प्रफुल्ल पवार हे खरंतर शरद पवार यांचे राइटहँड म्हणून ओळखले जातात. त्यात प्रफुल्ल पटेल यांनी आज फडणवीस यांना निमंत्रित केल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. आगामी काळात आजचं एका मंचावरील येण्याचा काही संदेश तर नाही ना हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
राज्यातील राजकारणात गेल्या तीन वर्षात घडलेल्या घडामोडी पाहता आगामी काळात नवी राजकीय संस्कृती पाहायला मिळेल हे सांगता येणं कठीणच आहे.