Ajit Pawar Maharashtra Assembly Poem : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा 8 वा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते एक कविता बोलताना दिसत आहेत.
अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक आणि कवी विं.दा.करंदीकर यांची एक कविता सभागृहात ऐकवली. ही कविता सांगण्यापूर्वी त्यांनी विरोधकांकडे हात दाखवत त्याचे शीर्षक सांगितले. एवढं लक्षात ठेवा, असे या कवितेचे शीर्षक आहे.
उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥
अजित पवारांची ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अजित पवार ही कविता ऐकवताना सतत विरोधकांकडे बघून मिश्किल हसत असल्याचेही दिसत आहे. तर अजित पवारांच्या या कवितेवर सत्ताधारी पक्षातील नेते हे बाक वाजवत असल्याचे दिसत आहे.