मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवला जात आहे. सहाजिकच आज विधिमंडळाच्या सभागृहात या कथित व्हिडिओचे पडसाद उमटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी सभागृहात हा विषय लावून धरला.
त्यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर देताना महत्वाची घोषणा केली आहे.
‘पुण्याई पणाला लागते’
“अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे. त्यांनी ज्या भावना मांडल्या, त्याच्याशी मी सहमत आहे. राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात, ज्यावेळी माणसाच संपूर्ण राजकीय आयुष्य, पुण्याई पणाला लागते” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“हा प्रकार समोर आलाय. आपल्या काही तक्रारी असतील, तर आम्हाला द्या. गृहितिकांच्या आधारावर चौकशी होत नाही. काही ठोस असेल तर आमच्याकडे द्या आम्ही त्याची सखोल चौकशी करु. कोणाला पाठिशी घालणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
‘या केसपुरता ओळख जाहीर होणार’
“कोण महिला आहे, ती ओळख उघड करता येत नाही. या केसपुरता ती ओळख पोलिसांना सांगितली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून शोधून काढतील. अशी आयडेंटी ओळख जाहीर करता येत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“या प्रकरणात काही दबाव येणार नाही, काही लपवा-छपवी होणार नाही. याची अतिशय वरिष्ठ पातळीवर, सखोल चौकशी केली जाईल” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.