राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने परभणीत महायुतीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांचं कौतुक केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चालू आहे का? आम्ही त्यांना सांगितलं हो चांगलं चालू आहे. आता तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत. महादेव जानकर यांचा अर्ज भरण्याकरता जात आहोत. तेव्हा मोदी म्हणाले, जानकरांना सांगा की, अठराव्या लोकसभेसाठी मी त्यांची वाट पाहत आहे. तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे. माझ्याकडून परभमीच्या नागरिकांना बोला की, तुमच्यासाठी जानकारांना पाठवलं आहे. त्यांना सकुशल दिल्लीला पाठवा. मोदींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महादेवराव जानकर हे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहेत. माझ्यासोबत पाच वर्ष मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं. कूरकूर नाही, कुरबूर नाही. सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं. सामान्य माणसाकरता काम करायचं. अरे पाच वर्षात 1 रुपयांचा डाग देखील या महादेव जानकरांना कुणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतरही फाटकाच राहीला, आजही फाटकाच आहे. जन्मभर फाटकाच राहणार आहे, म्हणूनच लोकांच्या मनात त्यांचं घर आहे. महादेवराव जानकर यांची श्रीमंती ही इथे बसलेले लोकं आहेत. महादेव जानकरांची श्रीमंती ही महाराष्ट्रातील दिन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्यांक यांच्या मनामध्ये जी जागा आहे, ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांचं कौतुक केलं.
“मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानेन. ज्यावेळी युतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अजित दादांना आम्ही सर्वांना विनंती केली की, महादेव जानकर यांना या ठिकाणी लढवलं पाहिजे. अजित दादांनी तातकाळ विटेकरांना बोलावलं आणि सांगितलं की, आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे. त्यांनी ते मान्य केलं. सर्वांनी जोरदार तयारी केली होती. पण आता सर्व ताकद महादेव जानकर यांच्या पाठिशी उभी राहणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “महादेव जानकर कर्जाच्या रुपाने आपलं मत मागत आहेत. हे कर्ज महादेव जानकर पुढच्या पाच वर्षात विकासाच्या रुपात तुम्हाला व्याजासहीत परत करतील, असा विश्वास तुम्हाला देण्याकरता आलोय. महादेव जानकर यांना मत म्हणजे मोदींना मत आहे”, असंही फडणवीस म्हणाले.
“महायुतीचं मोठं गठबंधन आम्ही तयार केलंय. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्राने 41 खासदार महायुतीच्या झोळीत टाकले. आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याहीपेक्षा जास्त खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाणार आहेत. त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजा ताई असणार आहेत, तसेच आमचे महादेवराव जानकर असणार आहेत”, असा दावा फडणवीसांनी केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षात देश बदलला. गरिबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा, पण मोदींनी या देशात पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला. आपल्याला आश्चर्य वाटेल की, जगही तोंडात बोट घालतंय, 10 वर्षात 25 कोटी नागरिरांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम मोदींनी करुन दाखवलं. जगातले अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, भारतात काय आश्चर्य झालं, जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदींनी कसं करुन दाखवलं? कारण मोदींनी मुठभर काम केलं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.