“मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूँ लौटकर फिर आऊँगा”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 वर्षांपूर्वी विधानसभेच्या सभागृहात म्हणाले होते. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतून उठून विरोधी पक्षनेते पदाच्या बाकावर बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सूचक वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते बनले होते. त्यावेळी त्यांनी अधिवेशनात या ओळी म्हटल्या होत्या. विशेष म्हणजे अडीच वर्षांनी ते खरंच सत्तेत पुन्हा आले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबत ‘टीव्ही9 सत्ता संमेलन’ कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “समंदर लौटकर आयेगा, सभी साथीयोंको वापस लेकर आयेगा. और २०२४ हे महाराष्ट्र आणि देशात एक नवीन इतिहास रचला जाईल. भाजप, शिवसेना, एनसीपी आणि रिपाइंचं महा अलायन्स आहे. आम्ही संपूर्ण मेजॉरिटीने सरकार स्थापन करू”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. “मी परत येणार असं मी विरोधी पक्षनेता म्हणून म्हणत होतो. माझ्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर देवेंद्र फडणवीस संपले असं काही लोक मानत होते. त्यांच्यासाठी हा संदेश होता. मै समंदर हूँ लौटकर आऊंगा और लौटकर आया”, असंदेखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“सीएम बनने माझं प्राधान्य असू शकत नाही. पाच वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो आहे. थोड्यावेळापूर्वी जी फिल्म दाखवली त्यात थोडी चूक होती. चार दिवसाचा नाही, मी तीन दिवसांचाच मुख्यमंत्री होतो. तुम्ही चार दिवस सांगितलं. मी पाच वर्ष मुख्यमंत्री होतो. त्यामुळे ती प्राथमिकता नाही. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार यावं हे प्राधान्य आहे. आम्ही विकास सुरू केला आहे. त्यात खंड पडू नये. ही कामे सुरू राहिली पाहिजे. हे प्राधान्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे बनणं प्राधान्य नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
“लोकसभेवेळी एक फेक नरेटिव्ह चाललं होतं. लोकसभेत महाविकास आघाडीला ४३.९ टक्के मते मिळाली. महायुतीला ४३.६ टक्के मते मिळाली. केवळ पॉइंट तीन टक्क्यांनी ते आमच्या पुढे होते. पण जागांमध्ये मोठी उलटफेर झाली. त्यात दोन कारणं होती. एक फेक नरेटिव्ह होतं. संविधान बदललं जाईल, आरक्षण जाईल असं सांगितलं जात होतं. आम्ही ते काऊंटर करण्यात कमी पडलो. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतो. त्यामुळे ज्या ताकदीने काउंटर करायला हवं होतं ते केलं नाही. आम्हाला वाटलं फेक नरेटिव्हचा परिणाम होणार नाही. पण त्याचा परिणाम झाला”, असं फडणवीस म्हणाले.
“आमच्या विरोधात लोक गेले. त्यामुळे आमच्यासमोर एक प्रॉब्लेम झाला तो म्हणजे मतांचं ध्रुवीकरण झालं. महाराष्ट्रात वोट जिहाद झालं. धार्मिक स्थळातून लोकांना मतदानाचं आवाहन करण्यात आलं. तुम्ही मतदान नाही केलं तर अल्लाचा विश्वासघात होईल, देवाचा विश्वासघात होईल, असं आवाहन करण्यात आलं. धुळे सारखी सीट एका लोकसभेत सहा विधानसभा येतात. त्यातील पाच विधानसभेत आम्ही एक लाखाने पुढे आहोत आणि मालेगाव मध्यमध्ये १ लाख ९४ हजाराने आम्ही मागे पडलो आणि चार हजाराने पराभूत झालो. हे जे वोट जिहाद झाले”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“आता परिस्थिती बदलली आहे. फेक नरेटिव्ह ब्रेक झाला आहे. संविधान बदलणार नाही. आरक्षणाला धोका नाही हे लोकांना माहीत आहे. आपल्या हातात संविधान घेऊन जाणारे राहुल गांधी आरक्षण संपवलं पाहिजे, असं परदेशात जाऊन सांगतात. आरक्षण संपवण्याचा फॉर्म्युला सांगतात आणि नाना पटोले त्यांचं समर्थन करतात. आता आम्हाला त्यावर बोलण्याची गरज नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.