विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंबन झाले. अनेक जुन्या चेहऱ्यांना आणि ज्येष्ठांना घरी बसवण्यात आले आहे. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. रविवारी ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे फडणवीस मंत्रिमंडळाची संख्या आता ४२ वर गेली आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ जण असून शकतात.
शिंदे यांच्या मंत्रिमंडळापेक्षा अनेक वेगळी नाव फडणवीस मंत्रिमंडळात आली आहे. एकूण २५ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अशोक उइके, आशीष शेलार, दत्तात्रेय भरणे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगवले, मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशीष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डिकर, इंद्रनील नाइक यांचा समावेश आहे.
मंत्रिपदाबाबत महायुतीत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. तिन्ही पक्षाचे नेते या फॉर्म्युलावर तयार झाले. काहींना अडीच अडीच वर्ष संधी देणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांनी अनेक वेळा आम्हाला एमएससी आणि मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याची पुर्तता झाली नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीत सांगितले होते की जागा देत नसाल तर आम्हाला मंत्रिमंडळात पहिल्यांदा सन्मान द्या. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी सांगितले होते की तुम्हाला मंत्रिपद देऊ. मात्र अडीच वर्ष मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही.