भारतीय जनता पक्षमधील अंतर्गत राजकारणात एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत आले आहे. राज्य भाजपमध्ये पहिल्या फळीचे नेते असलेले एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर अनेक आरोप केले होते. अजून या दोन्ही नेत्यांवर आरोप करण्याची संधी एकनाथ खडसे सोडत नाही. आता एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या १५ दिवसांत आपला भाजप प्रवेश होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राज्यातील नेत्यांना अजून कल्पना नाही. त्यांचे कट्टर विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे यांच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तर त्याला विरोध नाही. मात्र पक्षाने अजून आम्हाला कळविले नाही. पक्षाने कळवले आम्ही त्यांचे स्वागतच करु.
खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल त्यांचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय विरोधक गिरीश महाजन म्हणाले, खडसेंचा प्रवेश कधी होणार आहे, हे त्यांनाच माहीत आहे. खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे. अमित शाह यांच्याशी आहे, असे ते म्हणतात. एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की, आमची भूमिका तिच राहणार आहे. ते दिल्लीला, जात आहेत, येत आहेत. आता त्यांनी सांगितलंय 15 दिवसांनी प्रवेश घेणार आहे. वाट बघू, एकनाथजी खूप मोठे नेते आहेत. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे ते काम नाही. त्यांचा प्रवेश राज्यात होणार नाही. दिल्लीत त्यांचा प्रवेश होणार आहे. यामुळे त्यांच्याविषयी फार बोलणे संयुक्तीक नाही.
देवेंद्र फडणवीस अन् गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांनी नाव न घेता उत्तर दिले आहे. खडसे म्हणाले,
एखाद्याला जर असं वाटत असेल की हा प्रभावी नेता आहे, मग ते अस्वस्थ होतात. माझा काही फारसा प्रभाव पडणार नाही असे ते म्हणतात तर त्यांना अस्वस्थ वाटण्याचे कारण नाही. पक्षात कोण अस्वस्थ आहे, त्यापेक्षा हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातो, हे महत्वाचे आहे. पक्षप्रवेशाच्या निर्णयात प्रदेशाचे अध्यक्ष असतात, प्रदेशाचे पदाधिकारी असतात, त्यांनी सहमती दिल्यावरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवले जातो. केंद्राकडून जर निर्णय मान्य झाला तर तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो.