मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. ते आज आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं हेलिपॅडवर आगमण झालं, त्यावेळी तिथे भाजप नेते पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील हजर होते. अण्णा हजारे यांनी पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
अण्णा हजारे यांनी देशात काँग्रेसची सत्ता असताना जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. या आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेवर आलं. अण्णा हजारे यांनी या आंदोलनापूर्वी देखील अनेक आंदोलनं केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे ते फारसे चर्चेत नव्हते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला अहिल्यानगरमध्ये उपस्थित असल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अण्णांनी पुष्पगुच्छ देऊन फडणवीस यांचं स्वागत केलं.
आज हिवरे बाजार गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाचं लग्न आहे. या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरमध्ये आले आहेत. मंत्र्यांना खातेवाटपानंतर हा त्यांचा पहिलाच अहिल्यानगर दौरा आहे. या दौऱ्यात त्यांचं स्वागत अण्णा हजारे यांनी केलं.
गृहखातं फडणवीसांकडेच
दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. मात्र मंत्र्यांना खात्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं. समोर आलेल्या माहितीनुसार गृहमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही होती, मात्र भाजपला गृहमंत्रिपद आपल्याकडेच ठेवायचं होतं. त्यामुळे गृहमंत्रिपद कोणाला मिळणार? महत्त्वाची खाती कोणत्या पक्षाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर शनिवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलं. गृह मंत्रालय हे फडणवीसांकडेच ठेवण्यात आलं आहे, अजित पवार यांना अर्थखात तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.