राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरुन चर्चा रंगली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे आमदार सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांनी भेटल्यामुळे मनोज जरांगेसह विरोधकांनी आमदार धस यांना लक्ष केले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातून प्रतिक्रिया देत विरोधकांना टोलवले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, हा हेतू ठेवून आमदार सुरेश धस काम करत आहे. या प्रकरणात ते पुढाकार घेत असल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण कुणाला भेटले याच्यावर जर अशा पद्धतीचा राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. सुरेश धस यांनी या प्रकरणांमध्ये गंभीर भूमिका घेतलेली आहे. ती सर्वांनी बघीतली आहे. ते गंभीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा असे करणे योग्य नाही. शेवटी धनंजय मुंडे हे सुद्धा राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे एखादा आमदार, एखाद्या मंत्र्याला भेटला तर काही फरक पडत नाही.
खासदार संजय राऊत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, मुर्खांना मी उत्तर देत नाही. हे माहीत असतानाही तुम्ही हा विचारतात, असे ते म्हणाले. अमृता फडणवीस यांच्या गाण्याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते गाणे रिलीज झाले आहे. फक्त बंजाराच नाही तर सर्व समाजाला ते गाणे आवडलेले आहे. एक प्रकारे ते आपल्या गुरूंच्या प्रती, संतांच्या प्रती एक आराधना आहे.
मुंबईत मराठी शाळांची टक्केवारी घसरली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, कुठल्याही मराठी शाळा बंद होणार नाही, याबाबत सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत. शाळा इंग्रजी असो की हिंदी असो त्यांना मराठी शिकवावे लागणार आहे. त्याची सक्ती आपण केलेली आहे. या सक्तीचे ते योग्य प्रकारे पालन करत आहेत की नाहीत याकडे आमचे लक्ष आहे. त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावे लागेल, अशा पद्धतीचा आपण निर्णय आहे.
नाशिक आणि रायगड पालकमंत्री याबाबतचा वाद लवकरच मिटले, असे फडणवीस यांनी म्हणाले. जळगावतील चोपडा येथील पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेबाबत फडणवीस म्हणाले, मध्यप्रदेश पोलिसांना आपण सांगितला आहे की तुमच्याकडे या पद्धतीच्या होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया रोखल्या गेल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या परिणाम आमच्याकडे होत आहे. दोन्ही राज्यांच्या पोलीस दलात समन्वय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहे.