ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस आली आहे. ठाकरे गटाच्या प्रचारातील मशाल गीतावरून ही नोटीस आली आहे. या प्रचार गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे दोन शब्द वगळण्याची सूचना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द वगळणार नसल्याचं सांगतानाच आम्ही या प्रकरणी कायदेशीर लढाई लढू, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाला आलेल्या या नोटिशीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी गाण्यात तरी जय भवानी शब्द का वापरावा? असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ठाकरे गटाला नोटीस आली हा निवडणूक आयोग आणि ठाकरे गटातील प्रश्न आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. मात्र, ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी गाण्यात तरी जय भवानी शब्द का वापरावा? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधा नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सुद्धा देवाच्या नावावर मते मागत आहेत, त्याबाबत तुमचं मत काय? असं फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्याबाबत निवडणूक आयोगाला विचारा, असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी जाहीरसभेला संबोधित केलं. कोरोना काळात लोक एकमेकांना ओळखत नव्हते. भारताला कोणी वाचवू शकत नाही, असं जग म्हणत होतं. पण त्यांना माहीत नव्हतं इथे मोदी आहेत. मोदींनी लस तयार केली म्हणून आपण जिवंत आहोत. मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागायचं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
सत्तेत आल्यावर संविधान बदललं जाणार असल्याचा विरोधक कांगावा करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, त्यामुळे ते असं बोलत आहेत. पण आम्ही कुणालाही संविधानाला हात लावू देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.