देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले गिरीश बापट यांच्या जिव्हाळ्याचे विषय

| Updated on: Mar 29, 2023 | 2:21 PM

गिरीश बापट यांचा हजरजबाबीपणा, सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे ते नेते होते.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले गिरीश बापट यांच्या जिव्हाळ्याचे विषय
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले आणि राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असताना सुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

हे सुद्धा वाचा

देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. पण, पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.

गिरीश बापट यांचा हजरजबाबीपणा, सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले.

पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणार्‍या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. म्हणूनच जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.