महायुतीत सर्व काही ओक्के… फक्त एका गोष्टीमुळे घोडं अडलं, ‘वर्षा’वर मनधरणीचा प्रयत्न सुरू

| Updated on: Dec 04, 2024 | 7:20 PM

महायुती सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. महायुतीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी महायुतीत सध्या सारं काही आलबेल आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

महायुतीत सर्व काही ओक्के... फक्त एका गोष्टीमुळे घोडं अडलं, वर्षावर मनधरणीचा प्रयत्न सुरू
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार
Image Credit source: ANI
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी राजभवनात दाखल होत आज सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. महायुती सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. महायुतीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी महायुतीत सध्या सारं काही आलबेल आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद हवं आहे. यासाठी ते आग्रही आहेत. पण भाजप ते सोडायला तयार नाही. त्यामुळे महायुतीत गृहखात्यावरुन जबरदस्त रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. भाजप शिंदेंना गृहखातं देण्यास तयार नाही. पण तरीही शिंदेंनी सत्तेत सहभागी व्हावे, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. याबाबत राजकीय विश्लेषकांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय विश्लेषकांचं मत काय?

ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “भाजपने प्रचंड असं यश आपल्या खिशात घेऊन 10 दिवसांचा संयम राखलेला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना विचार करण्यासाठी भाजपने 10 दिवस दिले आहेत. पण तरीही भाजपकडून त्यांना कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. एकंदरीत चित्र असं दिसतंय की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री जरुर होतील. पण त्यांना अर्बन डेव्हलोपमेंटवरच सर्व तहान भागवावी लागेल. भाजप त्यांना कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्री देणार नाही आणि अशा परिस्थितीत तर शक्यही वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना थोडीशी नमती भूमिका घ्यावी लागेल”, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी मांडलं.

“सत्तेच्या पासून दूर राहाणं हे राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. त्यामुळे सत्तेत सामील होऊनच त्यांना पुढचं राजकारण करावं लागेल. त्यामुळे महत्त्वाची खाती आपल्या पदरात कसे पडतील? एवढं ते पाहतील. तसेच कुणाला मंत्रीपद द्यायचं आणि कुणाला नाही याबाबत भाजपचं लक्ष असणार आहे. काही मंत्र्यांच्याबाबतीत भाजपने सरुवातीपासून विरोध केला आहे. त्यामुळे त्या मंत्र्यांचा विरोध ते कायम ठेवतील. एकंदरीत या मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा राहणार आहे. शिंदे यांची समजूत घालण्याचा काम देवेंद्र फडणवीस करत असतील तरी ते गृहमंत्रीपद देणार नाही. नाहीतर त्यांनी 10 दिवसांपूर्वीच ते केलं असतं”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया संजीव उन्हाळे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

‘भाजपचा प्रयत्न राहील की…’

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी एकत्रपणे राजभनावर जावून सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज खऱ्या अर्थाने या हालचालींना सुरुवात झाली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की, एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभाही होणार का? ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? आणि त्यांना गृहमंत्रीपद मिळणार का? मला असं वाटतं की, आपल्याला त्यासाठी वाट पाहवी लागेल. भाजपचा प्रयत्न राहील की, एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी राहावं”, असं विजय चोरमारे म्हणाले.

“मगाशी एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं नसलं तरी त्यांच्या बोलण्यातून एक टोन असा होता की, अनेकांनी त्यांना मंत्रिमंडळात सहभाही व्हावं, असा आग्रह केला. याचा अर्थ ते सकारात्मकपणे त्याचा विचार करत असावेत. मुद्दा असा आहे की, त्यांना गृहखातं मिळणार का? त्यांनी या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मंत्रिपदाची शपथ घ्यावी, यासाठी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले असावेत”, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषण विजय चोरमारे यांनी दिली.