राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना आज जीभ घसरली. ते मुंब्र्यात बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्याबाबत बोलत असताना आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. अजित पवार गट ही पाकिटमारांची टोळी असल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आव्हाडांच्या वक्तव्यावरुन मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही एकत्र असताना ज्यांना आधारस्तंभ मानत होतो, आता आम्ही त्यांना म्हणायचं का त्यांनी आमचा आधारस्तंभ चोरला?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आव्हाडांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या नेतेमंडळींकडून टीका झाल्यानंतर देखील आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा होता? जोरात सांगा. शरद पवारांना एक दिवस अजित पवार येतो आणि धक्का मारुन पक्षातून बाहेर काढून टाकतो. विशेष म्हणजे जाताता शरद पवारांच्या हातून घड्याळ देखील हिसकावून घेतो. ही पाकिटमारांची टोळी आहे, पाकिटमारांची. अरे तुमच्यात हिंमत होती ना, मर्दाची अवलाद असता अजित पवार तर बोलला असता, शरद पवारने तुतारी घेतली, मी सुद्धा दुसरी कोणती निशाणी शोधून घेतो आणि निवडणूक लढवतो, तसं बोलले असते तर आम्ही त्यांना मर्द म्हणाला असतो”, असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
“जितेंद्र आव्हाड यांचे आजपर्यंतचे जे वक्तव्य ऐकले असते, आम्ही एकत्र असताना ज्यांना आधारस्तंभ मानत होतो, आता आम्ही त्यांना म्हणायचं का त्यांनी आमचा आधारस्तंभ चोरला? एक लक्षात घ्या, कुणाची काय परिस्थिती, कोण कुणासोबत या सगळ्या गोष्टी आज बोलणं उचित नाही. कुणाला पाकिटल चोरणं म्हणतात त्यांनी आज जे काही झालंय घडलंय, ते येणारा काळ सांगेल”, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर दिली.