बीडः 2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला तुमची औकात दाखवून दिलीय, त्यामुळे आता फार अपेक्षा करू नका, अशी टीका धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीडमध्ये केली. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दोघांमध्ये चांगलेच वाक् युद्ध रंगले आहे. वडवणी येथील प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची खिल्ली उडवली. उत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे 32 व्या क्रमांकावर आल्याने पंकजा मुंडे म्हणाल्या, तुमच्या ताई पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. 32 व्या नंबरवर कधीही गेल्या नाहीत.
पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ 2019 मध्ये तुम्ही महिला व बालविकास मंत्री होत्या, ग्रामविकास मंत्री होत्या, महाराष्ट्राच्या नेत्या होतात, तेव्हा विधानसभा निवडणुकीत परळीतील जनतेनी तुम्हाला तुमची औकात दाखवली आहे. माझी 500 कोटी रुपये आणण्याची औकात आहे, नगदी हिशेब देऊ का?’ असा सवालही धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरपंचायत निवडणुकीत पाच ठिकाणी निवडून दिलं तर 100 कोटी रुपयांचा निधी देऊ, असं आश्वासन दिलंय. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, पाच ठिकाणची आश्वासनं मिळून 500 कोटी रुपये निधी होतो. 500 कोटी रुपये आणण्याची यांची ताकद तरी आहे का? या वर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं.
32 व्या क्रमांकाचे मंत्री या पंकजा मुंडेंच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांच्या विकासासाठी स्वतः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खातं सुरु केलं, त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. तुम्ही परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांचा याद्वारे अपमान केलाय’, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
जानेवारी महिन्यात बीड जिल्ह्यातील वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज येथील नगरपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने भाजपने येथे चांगलीच रणनीती आखली आहे. तसेच महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनीही धडाकेबाज प्रचार सुरु केला आहे. आता जनता कोणाच्या पारड्यात मते टाकेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
इतर बातम्या-