कोकणात धोपेश्वर-बारसू रिफायनरीचा मुददा पेटला, भाजपसह 51 संघटनांचा रिफायनरीला पाठिंबा, तर स्थानिकांचा आणि शिवसेना खासदारांचा विरोध

| Updated on: Aug 21, 2022 | 6:53 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना बारसू सोलगावची जमिन रिफायनरीसाठी जमीन घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर रिफायनरीला समर्थकांची संख्या वाढत चालली. बारसू-सोलगाव येथे एमआयडीसीने २४०० एकर जमिन पाहिजे अशी विनंती केली होती. याबाबतचे नोटिफिकेशन एमआयडीसीने काढले. याच जमिनीचा वापर आणि विस्तार करून धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प उभारण्याची मागणी होवू लागली. नाट्ये इथे क्रूड आँईल टर्मिनलसाठी जागेची चाचपणी केली गेली. माती आणि ड्रोन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून प्रकल्पाची आखणी सुरु झाली आहे.

कोकणात धोपेश्वर-बारसू रिफायनरीचा मुददा पेटला, भाजपसह 51 संघटनांचा रिफायनरीला पाठिंबा, तर स्थानिकांचा आणि शिवसेना खासदारांचा विरोध
कोकणात रिफायनरी होणार का?
Image Credit source: social media
Follow us on

रत्नागिरी- राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता कोकणात धोपेश्वर-बारसू रिफायनरीचा (Dhopeshwar refinery) मुद्दा पुन्हा एकदा पेटताना पहायला मिळतो आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात धोपेश्वर, बारसू सोलगाव इथल्या पंचक्रोशीत रिफायनरी उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्या दृष्ट्रीने हालचाली सुरु झाल्यात. माती परिक्षण आणि ड्रोन सर्व्हेच्या (soil testing and drone survey)माध्यमातून धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने एक पाऊल टाकलं गेलंय. स्थानिकांनी मात्र या प्रकल्पाला विरोध केला आहे. कोणतंही परीक्षण या ठिकाणी होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या निलेश राणे यांनाही जनतेच्या रोषाचा काही वेळ सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी जमीन स्वतःहून देणाऱ्या जमिन मालकांशी संवाद साधला. दुसरीकडे शिवसेनेचा खासदार विनायक राऊत (Shivsena MP Vinayak Raut)यांनी कोकणात रिफायनरी होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. कुठल्याही स्थितीत शिवसेनेचा याला विरोध असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या रिफायनरीचे दलाल सत्तेत आले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात या रिफायनरीच्या समर्थन आणि विरोधावरुन पुढील काळात राजकारण तापण्याची चांगली शक्यता आहे.

यापूर्वी काय घडले होते?

जैतापूर अणु उर्जा प्रकल्प, नाणार रिफायनरी अशा प्रकल्पाच्या विरोधामुळे कोकणातल्या भुमिपुत्रांचा विरोधानं इथं येणारे प्रकल्प येण्याआगोदर गाजले. जैतापूर आणि नाणार रिफायनरी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली पहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत नाणार रिफायनरी प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत या प्रकल्पाला शिवसेना भाजप युतीने पुर्णविराम दिला. मात्र त्यानंतर नवीन जागेचा पर्याय पुढे आला तो म्हणजे धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचा. राजापूर शहराच्या जवळच्या भागात धोपेश्वर, बारसू सोलगाव इथल्या जमिनीत हा प्रकल्प करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. पहिल्यांदा या ठिकाणाला शिवसेनेनी सुद्धा समर्थन दिले. त्यानंतर या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोठा गट पुढे आला. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला अत्तापर्यत कुठल्याच राजकीय पक्षांनी विरोध केला नाही हे विशेष.

काय आहे धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना बारसू सोलगावची जमिन रिफायनरीसाठी जमीन घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर रिफायनरीला समर्थकांची संख्या वाढत चालली. बारसू-सोलगाव येथे एमआयडीसीने २४०० एकर जमिन पाहिजे अशी विनंती केली होती. याबाबतचे नोटिफिकेशन एमआयडीसीने काढले. याच जमिनीचा वापर आणि विस्तार करून धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प उभारण्याची मागणी होवू लागली. नाट्ये इथे क्रूड आँईल टर्मिनलसाठी जागेची चाचपणी केली गेली. माती आणि ड्रोन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून प्रकल्पाची आखणी सुरु झाली आहे. पाच हजार एकर वर होणाऱ्या प्रकल्पासाठी चार हजार एकरच्या जमीन मालकांनी जमीन घ्यावी म्हणून संमतीपत्र दिली आहेत. धोपेश्वर, बारसूस सोलगाव, शिवणे, गोवळ अशी धरून ११ गावे यात समाविष्ट असणार आहेत.

हे सुद्धा वाचा

धोपेश्वर रिफायनकी प्रकल्पाला कुणाचा पाठिंबा? .

धोपेश्वर रिफायनकी प्रकल्पाला जिल्ह्यातील विविध ५१ संघटनांनी पाठिंबा दिलाय. यात शिवसेना खासदार विनायक राऊत वगळता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाांनी पाठिंबा दिला आहे. रिफायनरी प्रकल्पाची मुहुर्तमेढ घडवण्यासाठी केंद्रात नारायण राणें लघु आणि सुक्ष्म उद्योग मंत्री आणि शिंदे गटात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना उद्योग मंत्री यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. रिफायनरीच्या समर्थनार्थ एका संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील विविध ग्रामपंतायतींचे समर्थनाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. राजापूरच्या काही शिवसैनिकांचे धोपेश्वर रिफायनरीला समर्थन आहे.

विकास आणि रोजगार मुद्द्यावर समर्थन

धोपेश्वर रिफायनरीला समर्थन हे कोकणात रोजगार आणि इथला विकास याच मुद्यावर दिलं जातंय. कोकणातली बेरोजगारी संपवण्यासाठी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी हे सुद्धा समर्थनाच्या भूमिकेत आत्तापर्यंत आहेत.

प्रकल्पाला विरोध कुणाचा?

रिफायनरीच्या विरोधाचाही एक गट आहे. यात गोवळ गावातील ग्रामस्थ आक्रमक आहेत. प्रदुषणकारी प्रकल्प नको याच मागणीसाठी इथले ग्रामस्थ आक्रमक झालेत. या आगोदर देखिल धोपेश्वर रिफायनरीचा माती परिक्षण आणि ड्रोन सर्व्हे इथल्या ग्रामस्थांनी अडवून धरला होता. आज देखिल धोपेश्वर रिफायनरीच्या सर्व्हेक्षणाच्या पाहणीसाठी आलेल्या निलेश राणेंचा ताफा विरोधकांनी अडवला. प्रदुषणाच्या मद्यावर हा विनाशकारी प्रकल्प नको अशी भूमिका इथल्या रिफानरी विरोधक ग्रामस्थांनी घेतलीय. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखिल धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला पहिल्यापासूनच विरोध केलाय. आज एकीकडे शिवसेना समर्थनात असून देखिल शिवसेना खासदार विरोधात आहेत.

विरोध राहणारच – अशोक वालम

कोकणात आम्ही कुठेली रिफायनरी प्रकल्प होवू देणार नाही अशी भुमिका कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पुन्हा एकदा सष्ट केलीय. या बाबत बालम म्हणाले कि आम्ही अत्तापर्यत वेट अँण्ड वॉचची भुमिका घेतली होती. जो पर्यत सरकार पाऊल टाकत नाही तो पर्यत आम्ही शांत होतो.पण आम्ही विषय सोडलेला नाही.ज्यावेळी प्रकल्पासाठी शंभर टक्के लोकं अनुकुल असतील त्यावेळी हा प्रकल्प करावा असा उदय सामंत यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे त्यामुळे याचे आम्ही स्वागत करतोय. कोकणात हा प्रकल्प नको यासाठी येत्या काही दिवसात आम्ही शासनासोबत वाटाघाटी करू असं अशोक वालम यांनी सष्ट केलं.शासनाच्या बैठकीला आम्ही नक्की जावू असंही अशोक वालम यांनी सष्ट केलं.

पुढे काय होणार?

नाणार रिफायनकी प्रकल्पाच्या वेळी भाजप सोडल्यास इतर सर्व पक्षांचा या प्रकल्पाला विरोध होता. आता परिस्थिती बदललेली आहे. आता शिवसेना खासदार वगळता कोणत्याच पक्षाचा विरोध धोपेश्वर रिफायनरीला राहिलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प कोणते वळण घेतो, या मुद्द्याचे पुन्हा राजकारण होते का, यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.