धुळे लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस असं सलग 45 वर्षे समीकरण एकेकाळी राहिलं. काँग्रेसने तब्बल 45 पेक्षा जास्त वर्षे या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवलं. तसं वर्चस्व ठेवण्यात काँग्रेसला तिथे यश आलं. पण गेल्या 15 वर्षांपासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटला आहे. काँग्रेसकडून खूप प्रयत्न केल्यानंतरही तिथे आपला उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे बालेकिल्ल्यातच काँग्रेसचा स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. या मतदारसंघात आमदार कुणाल बाबा पाटील यांची चांगली ताकद आहे. तसेच माजी मंत्री रोहिदास पाटील हे देखील धुळ्याचे आहेत. असं असताना काँग्रेसच्या हातून हा लोकसभा मतदारसंघ निसटला आहे.
धुळे लोकसभेचे एकेकाळच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आता काँग्रेसला विजयाची प्रतीक्षा करावी लागत आहे. सलग तीन पंचवार्षिकपासून भाजपचा धुळे लोकसभा मतदारसंघावर कब्जा आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाला 2009 च्या अगोदर काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. मात्र 2001 साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यानंतर मात्र चित्र बदलत गेलं. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपासून भाजपचा खासदार या लोकसभा मतदारसंघावर निवडून येतो आहे. यंदा देखील या मतदारसंघावर काँग्रेसला विजय मिळवण्यासाठी झटावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसच्या दोन नेत्यांनी तीन वेळा या मतदारसंघात सलग विजय मिळवला आहे. आदिवासी मतदारसंघ म्हणून या मतदारसंघावर काँग्रेसचा बोलबाला होता. मात्र 2001 नंतर आरक्षित असलेला हा मतदारसंघ खुल्या वर्गात गेला आणि त्यानंतर मात्र या मतदारसंघाचे चित्र बदलले. धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि सटाणा या विधानसभा मतदारसंघासह हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर मात्र गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघावर भाजपचा कब्जा आहे.
1957 ला पहिल्यांदा धुळ्यात भाजपचा खासदार निवडून आला होता. पण त्यानंतर पुढचे 45 वर्ष काँग्रेसच्या हातात हा मतदारसंघ राहिला. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला. पण त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला काँग्रेस खासदार निवडून आला. 1999 साली पुन्हा भाजप, त्यानंतर 2004 ला काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला. पण त्यानंतर झालेल्या तीनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.
भाजपाच्या वतीने डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली असली तरी अद्यापही काँग्रेसच्या वतीने या मतदारसंघात उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही. सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, नाशिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे त्याचबरोबर आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील आणि प्रतिभा शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र या मतदारसंघात काँग्रेसला विजयाची अद्याप तरी प्रतिक्षाच आहे.