धुळे | 5 जानेवारी 2024 : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा जवळ येत आहे. रामलल्ला येत्या 22 जानेवारी 2024 ला अयोध्येत आपल्या भव्य अशा मंदिरात विराजमान होणार आहेत. हा कार्यक्रम भव्य आणि संस्मरणीय बनवण्यासाठी जोरात तयारी सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्रानेही महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामध्ये 22 तारखेच्या होम हवन पूजेच्या साहित्याचा मान धुळे जिल्ह्यातील एका परिवाराला मिळाला आहे. चंद्रकांत केले असं या परिवारातील कुटुंबप्रमुखाचं नाव आहे. चंद्रकांत केले यांचे चिरंजीव विशाल केले यांनी राम मंदिरासाठी पूजेचे सर्व साहित्य अयोध्येत पाठवलं आहे.
हे सर्व साहित्य सामान आज अयोध्येत दाखल झालं आहे. राम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी या साहित्याचे पुजन केलं आहे. पूजेच्या वेळी 200 कलशाने रामाला अंघोळ घातली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे पूजेत वापरण्यात येणारा कलशदेखील महत्वाचा आहे. या कलशात तीन धातूंचा उपयोग करण्यात आला आहे. सोने, चांदी आणि तांब्यापासून हा कलश तयार करण्यात आला आहे. यामुळे या सोहळ्याला अधिक महत्त्व येणार आहे. या होम हवानासाठी लागणारे लाकूडही महाराष्ट्रातून आणण्यात आल आहे.
महाराष्ट्रामधील धुळ्यातील विशाल केले यांच्या मनात श्रीरामांबद्दल अतूट श्रद्धा आणि प्रेम आहे. त्यांच्या मनात आस्था असल्याने त्यांनी विचार केला की, आपल्या हातून राम मंदिरासाठी काही सेवा झाली पाहिजे. त्यामुळे धुळ्याच्या सोनगीर गावातून त्यांनी पुजेसाठी कलश बनवला. देवाच्या स्नानासाठी 200 कलश त्यांनी तिथून पाठवले आहेत. तसेच त्यांनी पाठवलेल्या भांड्यांनी रामलल्लांना स्नान घातले जाणार आहे, अशी माहिती अयोध्येतील गुरुजींनी दिली आहे.
जवळपास 400 ते 500 वर्षांपासून अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधण्यात यावं, अशी मागणी केली जात होती. अखेर ही मागणी आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदी यांनी या मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत येऊन गर्दी न करता आपल्या घरीच दिवा लावून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात अयोध्या दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अयोध्येतील पुनर्बांधणी झालेल्या रेल्वे स्थानकाचं तसेच अयोध्या विमानतळाचं उद्घाटन केलं होतं. तसेच त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोदी पुन्हा अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.