राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आधीच फूट पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वेगळा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वेगळा गट पडलेला आहे. पण या फूट पडलेल्या गटांमध्ये देखील अंतर्गत धुसफूस असल्याचं चव्हाट्यावर येत आहे. अजित पवार यांच्या गटातली अंतर्गत गटबाजी आज उफाळून बाहेर आलेली बघायला मिळाली. विशेष म्हणजे मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर ही गटबाजी चव्हाट्यावर आली. धुळ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वत: मंत्री अनिल पाटील उपस्थित होते. या बैठकीत अनिल पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची बघायला मिळाली. कुठल्याही कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या धुळे शहराध्यक्षांना माहिती दिली जात नसल्याची तक्रार यावेळी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली. धुळ्यात अजित पवार गटाच्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये धुळे शहराध्यक्षांनाच विश्वासात घेतलं जात नाही, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळानंतर आता मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“कार्यकर्त्यांच्या भावना प्रामुख्याने या होत्या की धुळे मतदारसंघात जे कुणी विद्यमान उमेदवार असतील आणि ते भविष्यात खासदार होतील. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही विश्वासात घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत महायुतीच्या प्रत्येक घटकाला त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे ही कार्यकर्त्यांची प्रमुख भावना होती. येणाऱ्या काळात आमच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये जो कुणी निवडून येणारा खासदार असेल त्याने आमच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे. त्या खासदाराने विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये मदत करायला हवी. आमच्या पक्षात आज जी चर्चा झाली त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांना असा गैरसमज झाला की शहराची बैठक होती. आम्हाला बोलवलं गेलं नाही. पण शहराची बैठक ही वेगळी होणार आहे. ग्रामीणची बैठक आज पार पडली आहे”, अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
“धुळे जिल्ह्यात कुठेही मतभेद नाहीत. काही मतभेद असल्यास तातडीने मिटवणार आणि महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार. नाशिकच्या जागेवरून मतभेद सुरू आहेत. पण मेरिटवर ही जागा दिली जाणार आहेत. नाशिकची जागा मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. पण दोन ते तीन दिवसात नाशिकच्या जागेच्या तिढा सुटणार आहे”, अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली.
“संपूर्ण महाराष्ट्रासह देशात काँग्रेसच्या धुव्वा उडणार. तेव्हा राहुल गांधी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करतील. काँग्रेस रक्षताळाला पोहोचली आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी राहुल गांधी असे वक्तव्य करत आहेत. आपलं संघटन कुठेतरी कमी पडत आहे. याकडे पाहण्याऐवजी राहुल गांधी एजन्सी आणि न्याय देणाऱ्या न्याय देवतेवर शंका उपस्थित करत आहेत”, असा दावा अनिल पाटील यांनी केला.
“वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याच्या विळा उचललाच पाहिजे. काँग्रेसचं सरकार असतानाची परिस्थिती आणि मोदी सरकार काळातील परिस्थिती प्रकाश आंबेडकर यांनी पाहिली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पाडलेच पाहिजेत. काँग्रेस बरोबर जे जे पक्ष असतील त्यांच्यावरती त्यांच्या डोळा आहे, राग आहे. महाविकास आघाडीतील उमेदवारांना पाडण्याच्या विळा आंबेडकरांनी बरोबर उचला आहे”, असा टोला अनिल पाटील यांनी लगावला.