धुळेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षात तीव्र खदखद व्यक्त होतेय. एकीकडे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे (More) यांनी या निर्णायला जाहीर विरोध केलेला असताना आता धुळ्याचे उपमहानगर प्रमुख साहिल खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. इतकेच नाही, तर त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कडव्या हिंदुत्वावर स्वार होण्याचा राज ठाकरे यांना फायदा किती होईल, हे लगेच सांगणे अवघड आहे. मात्र, त्यांना सध्या याची जबर किंमत मोजावी लागतेय. एकतर पक्षाकडे चांगले कार्यकर्ते असणे आणि ते टिकवून ठेवणे हे सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचे झाले आहे. मात्र, मुंबईसह अठरा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असा एकेक शिलेदार गळणे राज ठाकरे यांना चांगले महागात पडू शकते, अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेले दिसतेय.
राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून राजीनामा देणारे साहील खान हे धुळ्याचे उपमहानगर प्रमुख होते. त्यांचे येथील कामही चांगले आहे. त्यांच्यासोबत इतर मुस्लिम कार्यकर्त्यांनीही पक्षाला रामराम ठोकलाय. खान हे गेल्या सात वर्षांपासून मनसेचे प्रामाणिकपणे काम करत होते. नुकतेच त्यांनी जनसेवेसाठी अडीच लाख रुपये खर्च करून एक ॲम्बुलन्स देखील घेतली होती. त्या ॲम्बुलन्सवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते स्थापन विभाग नाव आणि राज ठाकरे यांचा फोटो लावला होता.
राज ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केलीय. ईडीची एक नोटीस आली आणि राज सुतासारखे सरळ झाले. इतक्या दिवस लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आता तेच राज चक्क मोदींचे गुणगाण करतायत. स्वतः कडवे हिंदुत्व स्वीकारत मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवत आहेत. मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आवाहन करत आहेत. या साऱ्यावरूनही ते टीकेचे धनी होतायत.
राज यांनी पाडव्यादिवशी शिवतीर्थावरून घेतलेली सभा आणि कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेने पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघालाय. त्यातच मंगळवारी (12 एप्रिल) सायंकाळी ठाण्यात त्यांची पुन्हा एकदा झंझावाती सभा होतेय. ते या सभेत काय बोलणार याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागलीय.