शरद पवार धुळ्यात कडाडले, म्हणाले, ‘तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी…’

| Updated on: Nov 11, 2024 | 4:00 PM

"गेल्या 10 वर्षांपासून मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि ते प्रश्न शरद पवारांना विचारतात. शरद पवारांनी एवढंच केलं, तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला", असा घणाघात शरद पवारांनी केला.

शरद पवार धुळ्यात कडाडले, म्हणाले, तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी...
शरद पवार
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज धुळे जिल्ह्याती शिंदखेडा इथे जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “देशाची लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतले. लोकशाही वाचवण्यासाठी थोडी काळजी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय होते हे कळत नव्हते. त्यांनी लोकसभेला 400 पारचा नारा दिला. लोक हुशार होते. 400 लोकांना समजले. लोकांना कळले की देशाची घटना बदलायची आहे म्हणून त्यांना 400 पर हवे होते. त्यांनी हा डाव हाणून पाडला”, असं शरद पवार म्हणाले. “गेल्या 10 वर्षांपासून मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि ते प्रश्न शरद पवारांना विचारतात. शरद पवारांनी एवढंच केलं, तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”, असा घणाघात शरद पवारांनी केला.

“महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री दौरे करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी 10 वर्षांचा हिशोब दिला पाहिजे. त्यांची 10 वर्षांपासून सत्ता आहे आणि ते आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केलं? आज महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. केंद्रात आमचं सरकार असताना आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले”, असं शरद पवार म्हणाले.

‘महिलांसाठी योजना आणण्यापेक्षा तिला सुरक्षा द्या’

“आज शेतकरी चिंतेत आहे. आम्ही देशातील शेतकऱ्यांचं कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी कर्जमाफीचा प्रस्ताव आणला. आम्ही 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र मोदी ते करत नाहीत. एकीकडे महिलांवर अत्याचार वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यात 900 महिलांवर अत्याचार झाले, आणि सरकार म्हणते आम्ही लाडकी बहीण योजना आणली. महिलांसाठी योजना आणण्यापेक्षा तिला सुरक्षा द्या”, असं शरद पवारांनी सुनावलं.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांचं नागरिकांना आवाहन

“शिंदखेडा तालुक्यात गुंडगिरी वाढली आहे, एमायडीसीत उद्योग नाहीत. संदीप बेडसे सुशिक्षित जाणकार उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या. राज्यातील शेतकरी आज अडचणीत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज माफी देणार आहोत. जो नियमित कर्ज भरेल त्यांना 50 हजाराचे अनुदान देणार. शेती अवजारानवरील GST बंद करणार. आज राज्यात गुंडगिरी वाढली आहे. या भागात नवीन उद्योगधंदे यायला तयार नाहीत. शिंदखेडा तालुक्यात मुबलक पाणी आहे. मात्र उद्योगधंदे नाहीत. या तालुक्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यामुळे माहविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा”, असं आवाहन शरद पवारांनी केलं.